या घटनेने एकच खळबळ, म्हसवड पोलिसांकडून गुन्हा दाखल
म्हसवड: जिल्हा परिषदेच्या भालवडी (ता. माण) येथील शिक्षक महिलेला शाळेच्या वेळात शाळेत येऊन मारहाण करणाऱ्या व सरकारी डॉक्टर असणाऱ्या प्रमोद नारायण नारायने (रा. मार्डी ता. माण) याच्यावर म्हसवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे करीत आहेत. याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी शाळा भरल्यानंतर संबंधित महिला शिक्षक या शाळेत शिकवण्यासाठी जात होत्या. दरम्यान आरोपी प्रमोद नारायाने याने शाळेच्या कार्यालयात अचानक प्रवेश करून त्या महिलेस मारहाण करण्यास सुरुवात केली.
सर्व शिक्षक वर्गांवर अध्यापणाचे काम करीत होते. महिला शिक्षक मोठ्याने रडू लागल्याने सर्व शिक्षकांनी कार्यालयाकडे धाव घेतली. संबंधित महिला शिक्षक यांना त्यांच्या दिराच्या तावडीतून सोडवले.
घटनेची दखल घेत पोलिसांची मदत घेण्यात आली. तातडीने म्हसवड पोलिसांनी घटनेची दखल घेत, भालवडी प्राथमिक शाळेत धाव घेतली. पोलीस शाळेत पोहोचतील या भितीने आरोपी पळून गेला. म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनवणे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली.
याप्रकरणी मारहाण, विनयभंग असे गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित शिक्षिका यांना गेली अनेक वर्षे आरोपी हा विविध घरगुती कारणावरून त्रास देत होता. संबंधित महिला शिक्षक यांना दमदाटी करणे असे प्रकार सुरूच होते.
आरोपी डॉक्टर प्रमोद नारायाने हा शिंगणापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून आरोपीला लवकरच अटक करू, अशी माहिती सपोनि अक्षय सोनवणे यांनी दिली आहे.








