त्यामुळे या गुह्यात आतापर्यंत अटक केलेल्या संशयितांची संख्या आठ झाली आहे
कोल्हापूर : फुलेवाडी येथील आहिल्याबाई होळकरनगरातील महेश रोजंद्र राख (वय 23) या गुंडाच्या खून प्रकरणी मुख्य संशयित आणि गवळी गँगचा म्होरक्या, गुंड आदित्य शशिकांत गवळी (रा. दत्त कॉलनी, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर) याला पोलिसांनी पकडले.
सोमवारी सायंकाळी पाठलाग करुन, कोल्हापुरातील खानविलकर पेट्रोल पंपानजीक ही कारवाई केली. तसेच त्याच्या दोघा साथिदारांना हेर्ले (ता. हातकणंगले आणि साने गुऊजी वसाहत येथून ताब्यात घेतले. ही कारवाई करवीर पोलीस ठाण्याच्यागुन्हे शोध पथकाने केली. त्यामुळे या गुह्यात आतापर्यंत अटक केलेल्या संशयितांची संख्या आठ झाली आहे.
रविवारी स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखा व करवीर पोलिसांनी या खून प्रकरणी पियुष अमर पाटील (वय 23 रा. कणेरकरनगर, कोल्हापूर), मयूर दयानंद कांबळे (वय 22 रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर), सोहम संजय शेळके (वय 22 रा. वारे वसाहत, कोल्हापूर), बालाजी गोविंद देवूळकर (वय 26 रा. पाचगाव ता. करवीर), जुनेद पटेल (वय 22 रा. फुलेवाडी, कोल्हापूर) या पाच जणांना अटक केली होती.
त्या सर्वांना सोमवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या खुनातील अद्यापी 4 ते 5 संशयित पसार असून, यामध्ये गवळी गँगचा प्रमुख आदित्य गवळी याचा भाऊ सिध्दांत शशिकांत गवळी याचा समावेश आहे. खून झालेला गुंड महेश राख याला पोलिसांनी गणेशोत्सवात तडीपार केले होते.
तडीपारचा कालावधी संपताच तो 10 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात आला होता. तसेच त्याने गवळी गँगचा म्होरक्या आदित्य गवळी याच्या पत्नीला प्रेम प्रकरणातून पळवून नेवून स्वत:च्या घरी ठेवले होते. तो तिच्याशी काही महिन्यानंतर विवाह करणार होता. पत्नीला पळवून नेल्याचा राग गुंड गवळी आणि त्याचा भाऊ संशयित सिध्दांत याला होता.
तसेच राख सतत गुंड गवळीला हिणवत होता. त्यामुळे गवळी बंधू त्याला संपवण्याची भाषा करीत होते. शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास गुंड गवळी, त्याचा भाऊ सिध्दांतसह 10 ते 12 जणांनी राख याचा फुलेवाडीत रिंग रोडवर खून केला. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या खुनाचा तपास करवीर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेच्या पोलिसांच्याकडून करण्यात येत आहे. या खुनातील 5 जणांना रविवारी रात्री अटक करण्यात आली आहे. तर अन्य संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याचदरम्यान करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांना संशयित व गवळी गँगचा म्होरक्या आदित्य हा सोमवारी सांयकाळी सीपीआर चौकात येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली.
त्यावरुन पोलिसांनी या चौकात सापळा लावला. यावेळी तो सिध्दार्थनगरकडून दुचाकीवऊन येत असलेला पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा इशारा केला. पण त्याने याकडे दुर्लक्ष करुन धुम स्टाईलनने कसबा बावडा रोडवरुन निघून जाऊ लागला. यावेळी पोलिसांना त्याचा पाठलाग करुन, त्याला शहरातील खानविलकर पेट्रोल पंपानजीक अडवण्यास यश आले.
त्यानंतर पोलिसांनी त्याचा साथिदार धीरज शर्मा (वय 23 रा. रामानंदनगर, कोल्हापूर) याला हेर्ले (ता. हातकणंगले येथील एका बिअर बार येथे पकडले. तर संशयीत सद्दाम कुंडले (वय 22 रा. बी. डी. कॉ लनी, कोल्हापूर) याला साने गुरुजी वसाहत परिसरातून ताब्यात घेतले. या तिघांना सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली असून, या तिघांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर अन्य संशयितांचा शोध सुरु आहे.








