वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारची राजधानी पाटणा येथे व्यावसायिक गोपाल खेमका हत्याप्रकरणावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपवर शाब्दिक हल्ला चढविला अहे. भाजप आणि नितीश कुमारांनी मिळून बिहारला भारताचे क्राइम कॅपिटल करून सोडल्याचा दावा राहुल गांधी यांनी रविवारी केला.
पाटण्यात व्यावसायिक गोपाल खेमका यांच्या हत्येमुळे पुन्हा एकदा बिहार भारताचे क्राइम कॅपिटल असल्याचे सिद्ध झाले आहे. बिहार आता लूट, गोळीबार व हत्येच्या सावटात जगत आहे. गुन्हे येथे ‘न्यू नॉर्मल’ ठरले असून सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.बिहारच्या बंधूभगिनींनी हा अन्याय आता आणखी सहन करू नये. जे सरकार लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही, ते लोकांच्या भविष्याची जबाबदारीही घेऊ शकत नाही. प्रत्येक हत्या, प्रत्येक लूट, झाडण्यात आलेली प्रत्येक गोळी आता परिवर्तनाची हाक तीव्र करत आहे. आता जेथे भय नाही, तर प्रगती असेल अशा नव्या बिहारची वेळ आली आहे. यावेळी मतदान केवळ सरकार बदलण्यासाठी नव्हे तर बिहारला वाचविण्यासाठी असेल, असे राहुल गांधी यांनी बिहारच्या लोकांना उद्देशून म्हटले आहे.
बिहारमधील प्रसिद्ध व्यावसायिक गोपाल खेमका यांची त्यांच्या निवासस्थानानजीक दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तर 7 वर्षांपूर्वी हाजीपूर येथे त्यांच्या पुत्राची देखील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोपाल खेमका यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैक घेतली आणि अधिकाऱ्यांना गोपाल खेमका हत्याप्रकरणाचा तपास लवकर पूर्ण करण्याचा निर्देश दिला आहे. गोपाल खेमका हे भाजपमध्ये कार्यरत होते.









