ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराफ यांच्यावर नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 डिसेंबर 2022 रोजी नगरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला कालिपुत्र कालीचरण महाराज आणि गुजरातमधील काजलदीदी हिंदुस्थानी उपस्थित होते. या मोर्चानंतर झालेल्या सभेत कालीचरण महाराजांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले होते. या भाषणाला जवळपास पाच महिने उलटून गेल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यावर 153 (अ) आणि 507 (2) या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.








