दक्षिण रहदारी पोलिसांकडून चालकाचा शोध घेऊन दुचाकी केली जप्त
बेळगाव : आरपीडी क्रॉस रोडवर एका चाकावर दुचाकी चालवित स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत सदर दुचाकी चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करत दुचाकीही जप्त केली आहे. तसेच अशा प्रकारची स्टंटबाजी कोणीही करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा गुन्हे तपास व वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त निरंजन राजे अरस यांनी दिला आहे. रविचंद्र साबण्णावर (वय 19, रा. हट्टीहोळी गल्ली, शहापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. आरपीडी क्रॉस रोडवर केए 65 एच 7135 या क्रमांकाच्या सुझुकी अॅक्सेस दुचाकीवर स्टंटबाजी करत एका चाकावर चालवित होता.
सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संबंधित दुचाकीचालकाचा शोध घेण्यासाठी दक्षिण रहदारी पोलीस स्थानकाचे निरीक्षक विनायक बडिगेर यांनी साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एस. बीचगत्ती यांना सूचना केली होती. त्यानुसार सदर वाहनाच्या क्रमांकाचा शोध घेतला असता ते वाहन हट्टीहोळी गल्ली शहापूर येथील सुरेंद्र बाळकृष्ण साबण्णावर यांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घराकडे जाऊन स्टंटबाजी केलेला व्हिडिओ दाखविला. त्यावेळी दुचाकी चालविणारा आपला मुलगा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीचालक रविचंद्र याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासह दक्षिण वाहतूक पोलिसांनी दुचाकीही जप्त केली आहे.









