ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणीने एका हॉटेलच्या रुममधून फेसबूक लाईव्ह करत त्यांच्यावर फसवणूकीचे आरोप केले होते. या व्हिडिओत स्वत: श्रीकांत देशमुखही होते. त्यांनी तरुणीच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला होता. या तरुणीने पुण्यातही देशमुख यांनी तिच्यावर अत्याचार केले असल्याची तक्रार डेक्कन पोलीस ठाण्यात आज दिली आहे. त्यानंतर देशमुखांवर लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत पुणे, मुंबईतील खेतवाडी आणि सोलापुरातील हॉटेल्समध्ये तसेच शासकीय विश्रामगृहात वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. श्रीकांत देशमुख यांच्यासोबत माझी आधीपासून ओळख होती. मुंबई भाजप शहर युवा मोर्चा जनरल सेक्रेटरी युवती सेल पदावर काम करत असताना श्रीकांत देशमुख यांच्यासोबत आपली ओळख वाढत गेली. श्रीकांत देशमुख यांनी मला तुळजापुरच्या मंदिरात लग्नाचे आश्वासन दिले होते. पण नंतर आपल्याला फसवल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने देशमुख यांना भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काही दिवांपूर्वी देशमुख यांनी या तरुणीविरुद्ध मुंबईत फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, यानंतर हे दोघे पुन्हा एकत्र आले होते. तरुणीने देशमुख यांनी लग्न करण्याचे आश्वासन देत फसवणूक केल्याचा आरोप केला होता.








