वृत्तसंस्था / नवी दिल्ली
क्रिकेटपटू मोहम्मद शमीची माजी पत्नी हसीन जहान हिच्याविरोधात तिच्या शेजाऱ्याने तक्रार सादर केली आहे. हसीन जहान हिची कन्या आर्शी हिच्या विरोधातही तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीतील आरोप गंभीर असून त्यांच्यात हत्येचा प्रयत्न करणे, गुन्हेगारी स्वरुपाचे करकारस्थान करणे, शारिरीक इजा करण्याचा प्रयत्न करणे, आदी आरोपांचा समावेश असल्याची माहिती आहे.
हसीन जहान हिने आपल्या शेजारी कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यात काही वाद निर्माण झाल्याने तिने ही कृती केली असे स्पष्ट होत आहे. या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रण करण्यात आल्याने जहान हिच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दलिया खातून असे जहान हिच्या शेजारणीचे नाव आहे. खातून हिने सादर केलेल्या तक्रारींच्या संदर्भात पोलिस पुढचा तपास करीत आहेत. जहान हिला पाचारण केले जाईल अशीही शक्यता आहे.









