ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे महापालिकेसमोर बेकायदेशीर आंदोलन करणे समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना चांगलंच भोवलं आहे. एकबोटे यांच्यासह चौघांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील एका मंदिराच्या अतिक्रमणाविषयी 4 सप्टेंबर रोजी मिलिंद एकबोटे, भाजप आ. नितेश राणे, भोसरीचे आ. महेश दादा लांडगे यांच्यासह काहींनी पुणे महापालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये ‘आई भवानी शक्ती दे, पुणेश्वर मुक्ती दे’, ‘जय श्रीराम’ आदी घोषणा देण्यात आल्या होत्या. दरम्यान, मोर्चामध्ये आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला होता. मुस्लिम संघटना या प्रकरणात आक्रमक झाल्या होत्या. नितेश राणे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा पुण्यात मोठं आंदोलन करू, असा इशाराही मुस्लिम संघटनांनी पुणे पोलिसांना दिला होता.
मुस्लिम संघटनांनी दिलेल्या निवेदनानंतर शिवाजीनगर पोलिसांनी आता पुण्येश्वर पुनर्वसन समितीचे अध्यक्ष कुणाल कांबळे, समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, किरण शिंदे, विशाल पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.








