वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध छत्तीसगडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महुआ मोईत्रा यांनी घुसखोरीच्या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध केलेल्या टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशातून होणारी घुसखोरी रोखण्यात अमित शहा अपयशी ठरल्याचा आरोप करत मोईत्रा यांनी त्यांचे ‘डोके कापून टेबलावर ठेवले पाहिजे’ असे वक्तव्य केले होते. यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत मोईत्रा यांच्या वक्तव्याला ‘अप्रिय आणि घृणास्पद’ म्हटले होते. तसेच माईत्रा यांनी जाहीर केलेली ही तृणमूल काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला होता.
पश्चिम बंगालमधील नादिया जिह्यातील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना महुआ यांनी केंद्र सरकार सीमा सुरक्षेवरील आपल्या जबाबदाऱ्या टाळत असल्याचा आरोप केला होता. गृहमंत्री वारंवार घुसखोरांबद्दल बोलत आहेत. सीमांची सुरक्षा ही गृह मंत्रालयाची जबाबदारी असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.









