वृत्तसंस्था/ भोपाळ
धोतर-कुर्ता हा पोषाख करुन धार्मिक विधी करणारे वेद पंडीत आता खेळपट्टीवर क्रिकेट खेळताना दिसणार आहे. संस्कृत भाषा बोलणाऱ्या वेद पंडीतांसाठी भोपाळने संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे.
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे अंकुर मैदानावर या स्पर्धेला 12 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतील सामन्यावेळी क्रिकेटचे समालोचन संस्कृत भाषेतून केले जाणार आहे. महर्षी महेश योगी यांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धा आयोजकांतर्फे विजेत्याला अयोध्या सहलीचे तिकीट दिले जाणार आहे. सदर स्पर्धेतील विजेत्या संघाला 21 हजार रुपयांचे बक्षीस तर उपविजेत्याला 11 हजार रुपयांचे बक्षीस त्याचप्रमाणे इतर वैयक्तिक बक्षीसे दिली जाणार आहेत. 22 जानेवारीला अयोध्यात होणाऱ्या श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या समारंभाला या स्पर्धेतील विजेत्याला पाठविले जाणार आहे.









