वृत्तसंस्था / दुबई
2028 च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला असून या क्रीडा प्रकारातील सामने द. कॅलिफोर्नियातील पोमोना शहरात आयोजित करण्यात येणार आहेत. सदर घोषणा आयसीसीतर्फे बुधवारी करण्यात आली.
तब्बल 128 वर्षानंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होत आहे. लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत टी-20 हा क्रिकेटचा प्रकार खेळविला जाणार असून पुरुष आणि महिलांच्या विभागात केवळ प्रत्येकी सहा संघांना प्रवेश दिला जाणार आहे. लॉस एंजिल्सपासून पोमोना हे शहर 48 कि.मी. अंतरावर आहे. या शहरामध्ये आता अद्यावत सुविधा असलेले क्रिकेट स्टेडियमवर तयार केले जाणार आहे. जागतिक स्तरावर क्रिकेटला आता दिवसेंदिवस अधिकच प्रसिद्धी मिळत आहे. आता 2028 च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्याने या स्पर्धेला आता शौकिनांचा आता प्रचंड प्रतिसाद लाभेल, असे आयसीसीचे चेअरमन जय शहा यांनी म्हटले आहे. 1900 साली झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता. लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटसह अन्य पाच नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लेक्रोसी (सिक्सीस) आणि स्क्वॅश यांचा सहभाग राहिल. 2010, 2014 आणि 2023 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या टी-20 क्रिकेट प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. तसेच 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही महिला क्रिकेटचा समावेश होता.









