लॉस एंजिलिस ऑलिम्पिकवेळी घेता येणार क्रिकेट सामन्यांचा आनंद : मुंबईतील बैठकीत निर्णय
वृत्तसंस्था/ मुंबई
क्रिकेट पुन्हा एकदा ऑलिम्पिकमधील क्रीडाप्रकार ठरला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028 च्या लॉस एंजिलिस गेम्समध्ये 5 क्रीडाप्रकारांना सामील केल्याची घोषणा मुंबईतील बैठकीनंतर केली आहे. यानुसार फ्लॅग फुटबॉलला पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले आहे. याचबरोबर बेसबॉल-सॉफ्टबॉल, लेक्रोसे आणि स्क्वाशला स्थान देण्यात आले आहे. लॉस एंजिलिसच्या अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात क्रीडाप्रकारांच्या यादीचा प्रस्ताव ठेवला होता तर आयओसी कार्यकारी मंडळाने शुक्रवारी यासंबंधी शिफारस केली होती. 1900 सालानंतर पहिल्यांदाच क्रिकेटला ऑलिम्पिक स्पोर्ट्सचा दर्जा देण्यात आला आहे.
नव्या सर्व पाचही क्रीडाप्रकारांना ऑलिम्पिकमध्ये सामील करण्याच्या प्रस्तावाला मुंबईत पार पडलेल्या बैठकीत 99 आयओसी सदस्यांपैकी केवळ दोन सदस्यांनी क्रिकेटच्या समावेशाला विरोध दर्शविला होता. आयओसीच्या बैठकीत भारताने भाग घेतला आहे. भारत सध्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करत आहे. मुंबईत आयोजित आयओसीच्या बैठकीत थॉमस बाच यांनी क्रिकेटसह आणखी 4 क्रीडाप्रकार सामील करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
क्रिकेटच्या समावेशामुळे आर्थिक लाभ
क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाल्याने आयओसीला भारतातील प्रसारण हक्कांद्वारे 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक कमाई होण्याची अपेक्षा आहे. पुरुष आणि महिलांसाठीच्या ऑलिम्पिक क्रिकेट स्पर्धेत 6 संघ सहभागी होतील, जे टी-20 प्रकारातील सामने खेळणार आहेत.
फ्लॅग फुटबॉलचे आकर्षण
फ्लॅग फुटबॉल आणि बेसबॉल-सॉफ्टबॉल हे क्रीडाप्रकार 5 वर्षांच्या काळात ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर एनएफएल आणि एमएलबी खेळाडूंना आणणार आहेत. यापूर्वी 1932 मध्ये लॉस एंजिलिस शहराने पहिल्यांदा ऑलिम्पिक समर गेम्सचे आयोजन केले होते. तर लेक्रोसे या क्रीडाप्रकाराचा ऑलिम्पिकमध्ये दोनवेळा समावेश झाला आहे. 1908 मध्ये अखेरचे लेक्रोसेला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले होते. लॉस एंजिलिसमध्ये हा सिक्स-ए-साइड प्रारुपात खेळला जाणार आहे. तसेच स्क्वाश देखील ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार असल्याचे आयोजक समितीचे अध्यक्ष कैसी वासरमॅन यांनी म्हटल आहे. तर लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सला स्थान मिळू शकले नाही. यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केल्यावर या प्रकाराची वापसी होणार नाही.
जागतिक क्रीडाप्रकार ठरणार
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट 128 वर्षांनी परतल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा मोठा विजय झाल्याचे मानले जात आहे. ऑलिम्पिकमधील समावेशामुळे क्रिकेटला जागतिक क्रीडाप्रकाराची ओळख मिळवून देण्यास मोठी मदत होणार आहे. यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन झाले होते.
ऑलिम्पिकमधील क्रिकेटचा इतिहास
ऑलिम्पिकमधील क्रिकेटचा इतिहास 1900 सालामधील पॅरिस येथील स्पर्धेशी निगडित आहे. या स्पर्धेवेळी ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सने क्रिकेटची सुरुवात केली होती. यात ग्रेट ब्रिटनने सुवर्ण तर फ्रान्सने रौप्य पदक जिंकले होते. या स्पर्धेत केवळ एकच क्रिकेट सामना झाला होता आणि तोच अंतिम सामना मानला गेला होता.









