फलंदाज कॉन्स्टास, फिरकीपटू कुहनेमन, अष्टपैलू वेबस्टर यांची प्रथमच वर्णी
वृत्तसंस्था/ कॅनबेरा
स्फोटक सलामीवीर सॅम कॉन्स्टास आणि डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमन यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले असून त्यांना 2025-26 साठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या केंद्रीय करार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. टी-20 विश्वचषकाला एक वर्षापेक्षा कमी काळ राहिलेला असताना कराराच्या यादीत तऊण अष्टपैलू खेळाडू कूपर कोनोली आणि वरच्या फळीतील फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्क यांना मात्र दुर्लक्षित करण्यात आले आहे.
कोन्स्टास, कुहनेमन व अष्टपैलू बॉ वेबस्टर यांची ऑस्ट्रेलियाच्या 23 सदस्यीय यादीत भर पडली आहे, तर शॉन अॅबॉट, एरॉन हार्डी व टॉड मर्फी यांना सुऊवातीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. ‘मॅटने (कुहनेमन) पुन्हा एकदा श्रीलंकेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि आम्हाला विश्वास आहे की, तो पुढील 18 महिन्यांत महत्त्वाची भूमिका बजावू शकेल’, असे बेली यांनी निवेदनात म्हटले आहे.
अबॉट आणि हार्डी यांना ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान देण्यात आले होते, परंतु संपूर्ण स्पर्धेत त्यांना एकही सामना खेळता आला नाही. मर्फी श्रीलंकेत तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून एका कसोटीत खेळला होता, परंतु 2025-26 मध्ये ऑस्ट्रेलिया भारतीय उपखंडाचा दौरा करणार नसल्यामुळे मर्फीला कराराच्या यादीतून बाहेर काढण्यात आले असण्याची शक्यता आहे. कोनोलीची अनुपस्थिती मात्र थोडी आश्चर्यकारक आहे. कारण तो ऑस्ट्रेलियाच्या मागील कसोटी आणि एकदिवसीय संघांचा भाग होता. गेल्या वर्षी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा करार मिळवूनही त्याला यादीतून वगळण्यात आले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची करार यादी : झेवियर बार्टलेट, स्कॉट बोलँड, अॅलेक्स केरी, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, लान्स मॉरिस, झाय रिचर्डसन, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, बॉ वेबस्टर, अॅडम झॅम्पा.









