जिल्हा प्रशासन लक्ष देणार का? : सावकारी कर्जाखाली शेतकरी अडकण्याची शक्यता, गरीब शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याची मागणी
बेळगाव : आता खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मशागत करण्याबरोबरच पैशांची जुळवाजुळवही करावी लागणार आहे. यासाठी कृषीपत्तीन सोसायटीमध्ये कर्ज वाढवून देण्यासाठी गेले असता अजून पत झाली नाही, अशी उत्तरे त्यांना दिली जात आहेत. मात्र यामुळे शेतकरी अडचणीत येत असून खासगी सावकारांकडून त्यांना कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. तेव्हा सरकारने याचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना पत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे. ज्या शेतकऱ्यांची पत झाली नाही त्या शेतकऱ्यांना सात-बारा उताऱ्यावर कर्ज द्यावे, अशी मागणीही होत आहे. शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज दिले जात आहे. पण या योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे कृषीपत्तीन सोसायटीमध्ये देऊन देखील पत नाही असे म्हणून त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू आहे. यामध्ये गरीब शेतकऱ्यांचाच अधिक समावेश असल्याने एक प्रकारे अनेक शेतकऱ्यांवर हा अन्याय होत आहे. सरासरी सर्वच शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज देणे गरजेचे असताना अशा प्रकारे सोसायट्यांमधून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने शून्यदर व्याजाने कर्ज उपलब्ध केले आहे. यामध्ये किमान 25 हजारांपासून 1 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांनी कृषीपत्तीन सोसायटीचा सदस्य होणे गरजेचे आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे उतारे देऊन शेअर्स रक्कम भरून सदस्य झाले आहेत. पण त्यांना पत नाही, असे सांगून कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. याचबरोबर काही शेतकऱ्यांना एकरी केवळ 10 ते 15 हजार रुपयेच काही कृषीपतीन सोसायट्यांनी दिले आहेत. रक्कम कमी आल्याने सध्या ही रक्कम घ्या, असे सांगितले. मात्र आता पुन्हा शेतकऱ्यांना पैशाची गरज असून ते शेतकरी सोसायटीकडे गेले असता अजून पत वाढवून आली नाही, अशी उत्तरे मिळत आहेत.
सरकार एकीकडे शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज देत आहे. पण या योजनेपासून बहुसंख्य शेतकरी वंचित आहेत. श्र्रीमंत शेतकऱ्यांनाच कर्ज देऊन त्यांनाच आर्थिक मदत केली जात आहे. गरीब शेतकरी मात्र या कृषीपत्तीन सोसायटीमधून कर्ज मिळत नसल्याने खासगी सोसायटी व सावकरांकडे कर्जासाठी धाव घेत आहेत. यातून कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी सापडत आहेत. यामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत येणार आहे. जर हे कर्ज मिळाले नाही तर खासगी सोसायटी व सावकारांकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. सध्या खरीप पेरणीच्या कामाला सुऊवात होणार आहे. यासाठी बी-बियांणे याबरोबरच खते खरेदी करणे गरजेचे आहे. पण गरीब शेतकऱ्याकडे पैसे नसल्याने हे शेतकरी आता खासगी सावकारांकडे हात पसऊ लागले आहेत. यासाठी आता सरकारने तातडीने या शेतकऱ्यांची पत करून कर्ज द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक पत वाढवून देण्यास तयार नाहीत, असे कृषीपत्तीन सोसायटीचे चेअरमन व संचालक सांगत आहेत. पण ही शेतकऱ्यांची दिशाभूल असून जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन गरीब शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
खरीप हंगामापूर्वीच कर्ज उपलब्ध करा
आता शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते खरेदी करावी लागणार आहेत. याचबरोबर मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर, बैलजोडी यांचीही गरज लागणार आहे. सध्या ट्रॅक्टर व बैलजोडीचे भाडे देखील वाढले आहे. त्यामुळे ते परवडणे अशक्य आहे. इतकी रक्कम जमा करणे कठीण असून तातडीने शेतकऱ्यांना खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच सोसायट्यांमधून कर्ज उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे.








