परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / बर्लिन
आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आज विश्वासार्हता आणि अनुमानक्षमता हे महत्वाचे विषय बनले आहेत, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. ते सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. युरोपियन महासंघाशी मुक्त व्यापार करार करण्याचा प्रयत्न भारत करत असून त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून त्यांचा हा दौरा आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के व्यापार शुल्कामुळे भारत आपल्या वस्तूंसाठी अन्य देशांमध्ये बाजारपेठ शोधत आहे. म्हणून जयशंकर जर्मनीला गेले असून त्यांना योग्य प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे.
बुधवारी जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जोहान वेडफुल यांच्याशी चर्चा केली. नंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेचेही आयोजन केले. सध्याच्या काळात जगात अनेक परिवर्तने अतिशय वेगाने घडत आहेत. त्यामुळे आर्थिक क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत भारत आणि जर्मनी यांनी एकमेकांच्या अधिक जवळ येण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धासंबंधीही त्यांनी भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. या दोन्ही देशांमधील समस्या केवळ चर्चेद्वारेच सुटू शकतात, हे भारताने प्रथमपासूनच स्पष्ट केले आहे. सध्याचा कालावधी युद्धाचा नसून सामोपचाराचा आहे, ही बाबही भारताने वारंवार मांडली आहे. त्यामुळे भारताच्या भूमिकेविषयी शंका घेण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
जर्मनीची भूमिका
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबावा आणि त्यांनी एकमेकांशी चर्चेला सज्ज व्हावे, हीच जर्मनी आणि युरोपियन महासंघाची भूमिका आहे. युकेन्रचे अध्यक्ष झेलेन्स्की हे चर्चेसाठी केव्हाही सज्ज आहेत. मात्र, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे मात्र चर्चेच्या टेबलवर येण्यास राजी नाहीत. रशियाने युव्रेनवर हल्ला केला आहे. युव्रेनने रशियाची काहीही कळ काढलेली नसताना, हा हल्ला झाला आहे, हे साऱ्या जगाला माहीत आहे. दोन्ही देशांनी त्वरित चर्चा करावी आणि या युद्धाला पूर्णविराम द्यावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी स्पष्टोक्ती जर्मनीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
रशियाच्या तेलाचा प्रश्न
भारत रशियाकडून इंधन तेल विकत घेतो, म्हणून ट्रंप यांनी भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लावले आहे. तथापि, अनेक देश रशियाकडून तेल घेतात. भारतासाठी आपली ऊर्जा सुरक्षा महत्वाची आहे. तसेच भारताला जगात जेथे तेल स्वस्त मिळेल तेथून घेण्याचा अधिकारही आहे. आम्ही रशियाचे तेल आमच्या आवश्यकतेपोटी घेत असून युद्धाला पाठबळ देण्याचा आमचा विचार नाही, या भारताच्या भूमिकेचाही पुनरुच्चार एस. जयशंकर यांनी यावेळी केला.









