सांगली / शिवराज काटकर :
जिल्हाधिकारी कार्यालयाचा तळमजला नेहमीप्रमाणे गंभीर वातावरण, फाईल घेऊन धावपळ करणारे कर्मचारी… पण आजचं दृश्य वेगळंच होतं. आज तिथं रंग, कल्पकता आणि आशेचा झगमगाट होता. मूकबधिर मुलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंच्या स्टॉल्सनी परिसर सजला होता आणि खरेदीसाठी गर्दी उसळली होती. वातावरणात उत्साहाची लहर होती.
ही मुलं म्हणजे केवळ दिव्यांग नाहीत तर स्वप्न पाहणारी, तंत्रज्ञानाची भाषा शिकणारी आणि स्वतःचं भविष्य घडवणारी एक झपाटलेली पिढी. मिरजेतील ‘दादू काका भिडे मूकबधिर विद्यालयात’ एआय आणि रोबोटिक्सचं प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंमध्ये वेगळेपण ठसठशीत दिसत होतं चारचाकी वाहनांच्या डॅशबोर्डवर ठेवण्यासाठी छोट्या देवतांच्या मूर्ती, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, फुलदाण्या, शुभेच्छापत्रं, भेटकार्डं, खरगंडीच्या कपड्यांचे बुके, झुंबर, तोरणं… प्रत्येक वस्तीत एक विचार, एक स्पर्श, एक आत्मा दडलेला.

सुरुवातीला शंका होती – “सरकारी कार्यालयात स्टॉल्स? कुणी येईल?” पण दुपारीचं दृश्य पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. जेवणाची सुट्टी झाली आणि कर्मचारी थेट स्टॉल्सकडे वळाले. कोणी फोनवरून घरी विचारून खरेदी केली, तर कोणी व्हिडिओ कॉलवरून वस्तू दाखवून निवड केल्या. अनेकांनी दोन-तीन वस्तू घेतल्या आणि भावनावश होऊन म्हणाले – “या मुलांकडून खूप काही शिकायला मिळतं…”
या संपूर्ण उपक्रमामागे होती जिल्हाधिकारी अशोकराव काकडे यांची दूरदृष्टी. काही दिवसांपूर्वी त्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यांच्या डोळ्यांतली चमक पाहूनच त्यांनी ठरवलं – “या मुलांची प्रतिभा योग्य मार्गदर्शनाने पुढं नेली, तर त्यांचं आयुष्य उजळू शकतं.” आजचा उत्सव त्यांच्या त्या शब्दांची प्रचिती होता.
- निबंध, चित्रकला आणि आवाजाच्या पलिकडचे विचार
या प्रदर्शनासोबतच सभागृहात दुसरा कार्यक्रम सुरू होता – पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या हिरक महोत्सवी स्मृतिदिनानिमित्त स्पर्धांचा समारोप. लहान मुलांच्या निबंधांमधून सत्तेतील बदल, सामाजिक जाणिवा स्पष्ट जाणवत होत्या. पेन्सिलने रेखाटलेली चित्रं इतकी सुंदर होती की पाहुणे थांबून त्यांचं कौतुक करत होते.
वक्तृत्व स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थिनींच्या भाषणांनी मात्र उपस्थितांमध्ये खऱ्या अर्थाने आत्मविश्वासाचं दर्शन घडवलं. त्यांच्या बोलण्यातली धार, मुद्द्यांची स्पष्टता आणि आवाजातील टवटवी ही आजच्या पिढीच्या विचारसंपन्नतेची खूण होती.

- यशामागे पडद्यामागचं नियोजन
हा उपक्रम सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू होता. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, आणि १२ शाळांचे शिक्षक व कर्मचारी परिश्रम घेत होते.यशस्वी आयोजनासाठी उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिसे, तहसीलदार अमोल कुंभार, तसेच महसूल विभागातील विनायक यादव, रवींद्र हराळे, संदीप देसाई, पोपट सानप, विजय जाधव, जयंत खोत यांचे योगदान मोलाचं होतं. वरच्या मजल्यावर ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर मार्गदर्शन करत होते, तर तळमजल्यावर खरेदीचा उत्सव रंगत होता.
- खरी ताकद भावनेतून
सामान्यतः सरकारी कार्यक्रम औपचारिक, कोरडे वाटतात. पण इथे वेगळं काही घडलं – कारण या मागे होती “दिव्यांग मुलांना सक्षम करण्याची खरी भावना”. ती भावना लोकांपर्यंत पोहोचली, म्हणून लोक सहभागी झाले. हा कार्यक्रम केवळ एक उपक्रम नव्हता, तर या मुलांच्या कल्पकतेचा, आत्मविश्वासाचा आणि समाजाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचा एक जिवंत उत्सव होता.








