प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे प्रतिपादन : साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा दिन
बेळगाव : मराठी भाषा वैश्विक व्हायला हवी, मराठी भाषेतील साहित्य अनुवादित होऊन इतर देशांमध्ये वाचले गेले पाहिजे, त्याचवेळी आपली मराठी भाषा अभिजात झाली आणि वैश्विक झाली असे आपण समजू. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा या वादात न पडता जे जे काही मराठीसाठी पोषक आहे ते सर्व स्वीकारण्याची मानसिकता असायला हवी. केवळ मराठी भाषा दिन किंवा अस्मिता ठेवून चालणार नाही तर मराठी भाषेला व्यावहारिक भाषा बनवून तिची वाचक संख्या वाढवावी लागेल. आज घरातील टी.व्ही.चा आकार मोठा होत चाललेला आहे आणि घरात छोटेसे ग्रंथालयदेखील असत नाही, ही मराठी भाषेची शोकांतिका आहे. यावर मराठी माणसाने विचार केला पाहिजे. फ्रान्समध्ये आज प्रत्येकाच्या घरात ग्रंथालय आहे त्याप्रमाणे आपल्याकडे आज प्रत्येकाच्या घरात मराठीचे ग्रंथालय असले पाहिजे. भाषिक लढा हा केवळ अस्मिता म्हणून न लढता जगभरात ज्या ज्या ठिकाणी भाषेच्या चळवळी झालेल्या आहेत त्या भाषिक चळवळींचा अभ्यास करून त्या प्रकारे आपल्याला सीमाभागातील मराठी भाषेची चळवळ उभी करावी लागेल. यासाठी येथील साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक व विचारवंतांनी येथील भाषेची मांडणी करायला हवी, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी केले.
ते पुढे म्हणाले, जगात सहा हजार भाषा बोलल्या जातात. त्यामध्ये मराठी 15-16 व्या नंबरवर आहे. ही मराठी भाषा टिकविण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. मातृभाषेतून कल्पकता, सृजनशिलता वाढेल यासाठी भाषेच्या निकषावर चर्चा होणे आवश्यक आहे. मराठी साहित्य समृद्ध आहे. शिवाय इतर भाषांच्या तुलनेत मराठी भाषेची स्थिती समाधानकारक आहे. राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे गुरुवारी विद्यानिकेतन शाळेच्या आवारात मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रम झाला. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जयंत नार्वेकर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, चिटणीस सुभाष ओऊळकर, सचिव प्रा. विक्रम पाटील, प्रा. सुरेश पाटील उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. इंद्रजित मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या फोटोचे पूजन व दीपप्रज्वलन झाले.
प्रा. बाविस्कर पुढे म्हणाले, भाषेचा भावनिकतेशी संबंध नाही. प्रत्येक वेळी आपण भावनिक होऊन चालत नाही, याचा समाज व्यवस्थेवर परिणाम होतो. भावनिकतेच्या पुढे जाऊन चिकित्सक वृत्ती जोपासली पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने भाषा समृद्ध होईल. समाजोपयोगी उपक्रमांचे सार्वत्रिकरण झाले पाहिजे, तेव्हाच भाषा आणि साहित्य अधिक प्रबळ होईल, असेही ते म्हणाले. यावेळी प्रा. सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्नेहल पोटे यांनी परिचय करून दिला. यावेळी पालकांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा, शिक्षकांसाठी पत्रलेखन आणि विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धांना स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.









