डॉ.सोमनाथ कोमरपंत यांचे प्रतिपादन
सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा
मानवी संस्कृतीच्या विकासात साहित्याचे स्थान अनन्य साधारण आहे. साहित्यामध्ये भाषेपेक्षा निर्मितीला प्राधान्य हवे. ग्रंथ हेच आपले खरे गुरु असून विश्व साहित्य हेही आपलेच साहित्य आहे, ही भावना साहित्यिक व वाचकांमध्ये हवी. स्वतःच्या भाषेत उत्तम साहित्यनिर्मिती करु शकणाऱया साहित्यिकांना परकीय भाषेच्या कुबडय़ा हव्यातच कशाला? मात्र भाषा वेगवेगळय़ा असल्या तरी साहित्याच्या सशक्तीकरणासाठी भाषाभगिनींमध्ये सामंजस्य तेवढेच महत्त्वाचे आहे, असे आग्रही मत ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या 60 व्या वर्धापनदिन सोहळय़ात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
नागेशी-बांदोडा येथील श्री नागेश महारुद्र देवस्थानच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याहस्ते झाले. यावेळी उदगीर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. उषा तांबा, श्री नागेश देवस्थानचे अध्यक्ष दामोदर भाटकर व साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष तथा अ. भा. साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर हे उपस्थित होते.
मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच डॉ. अब्दुल कलाम याच्या जयंतीनिमत्त ‘वाचन प्रेरणा’ दिनाचे औचित्य साधून डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला भारत सारणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
डॉ. कोमरपंत आपल्या बीज भाषणात पुढे म्हणाले, वर्तमानपत्र, साहित्य, आकाशवाणी ही एकेकाळी समाजासाठी प्रभावी माध्यमे होती. आज नवनीवन आधुनिक माध्यमांची त्यामध्ये भर पडली आहे. दूरदर्शन हे माध्यम सुरुवातीला श्रोत्यांच्या अभिरुचीनुसार काम करीत होते. आज ते सैरभर झाल्याचे जाणवते. कारण अर्थकारण हाच आधुनिक माध्यमांचा उद्देश बनत चलला आहे. माणसेही संवेदनशुन्य होत चालली आहेत. म्हणूनच साहित्यनिर्मिती सक्षम झाली पाहिजे. कारण साहित्यच चांगला समाज घडवित असते.
चांगले साहित्य नवीन पिढीपर्यत पोचले पाहिजे ः सुभाष शिरोडकर
मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, साहित्य हे माणसाला सन्मार्गाकडे नेणारे असावे. निसर्गाच्या सानिध्यात काव्य लिहिता आले पाहिजे, म्हणूनच नैसर्गिक सुबत्ता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. वाचन संस्कृती तग धरीत नाही, याची कारण मिमांसा व्हायला हवी. चांगले साहित्य नवीन पिढीपर्यंत पोचायला हवे. भाषा हे साहित्यासाठी वरदानच आहे, म्हणून कुठल्याही भाषेबद्दल आकस बाळगता कामा नये.
कल्पनाशक्तीला तरल करणारे साहित्य हवे ः सासणे
भारत सासणे आपल्या भाषणात म्हणाले, कल्पनाशक्तीला तरल करणारी पुस्तके हवीत. संगीत, चित्रकला किंवा संस्कृतीच्या चौकटीतील अन्य विषयांबद्दलची अनभिज्ञत कला न समाजणाऱया माणसांसाठी शिक्षाच आहे. भाषेची श्रीमंती वाचनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली असते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात माणसाला परिपक्वता येते. त्याच्यामागे आत्मानुभव हे कारण आहे. वाचन संस्कृती विकसित व्हावी यासाठी साहित्यिकांनी कंबर कसली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला हैदराबाद येथील मराठी साहित्य परिषदेच्या ‘पंचधारा’ त्रैमासिकाच्या शंकर रामाणी विशेषांकाचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन झाले. संपादक विद्या देवधर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भारत सासणे यांचा मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे कार्यकर्ते प्रकाश तळवडेकर यांचा उत्कृष्ट संघटक म्हणून भारत सासणे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
विदर्भ साहित्य संघाचे दिवंगत अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. उषा तांबे यांनी स्वागत केले. दुर्गाकुमार नावती यांनी सूत्रसंचालन तर रमेश वंसकर यांनी आभार मानले.
सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. सारिका आडविलकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन झाले. त्यात प्रकाश क्षिरसागर, प्रसाद सावंत, चित्रा क्षिरसागर, शर्मिला प्रभू. पद्माकर कुलकर्णी, दुर्गाकुमार नावती, विश्वनाथ जोशी, कविता आमोणकर, पौर्णिमा गावस देसाई, महेश पारकर, माधुरी उसगावकर, विनोद नाईक, रजनी रायकर, डॉ. अनिता तिळवे आदींनी आपल्या कविता सादर केल्या.
आज रविवार 16 रोजी सकाळच्या सत्रात 10 वा. ‘लिखित माध्यम’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. त्यात वक्ते म्हणून श्रीराम पवार (कोल्हापूर) व आसाराम लोमटे (औंरगाबाद) यांचा सहभाग असेल. चर्चक म्हणून राजू भि. नाईक (गोवा) व श्रीधर लोणी (मुंबई) यांचा सहभाग असेल. दुपारी 2 वा. ‘दृकश्राव्य माध्यम’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. त्यात रंगकर्मी देविदास आमोणकर (गोवा) व रविराज गंधे (मुंबई) हे चर्चक म्हणून तसेच सरिता कौशिक (नागपूर) व तुषार बोडखे (औरंगाबाद) हे सहभागी असतील.









