वाघा-अटारी सीमेच्या धर्तीवर रचना ः गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन
अहमदाबाद / वृत्तसंस्था
गुजरातमधील बनासकांठा जिह्यातील नदाबेट येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील व्हय़ू पॉईंटचे उद्घाटन रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. याप्रसंगी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. पंजाबच्या वाघा-अटारी सीमेच्या धर्तीवर हा व्हय़ू पॉईंट तयार करण्यात आला आहे. येथे फोटो गॅलरीही तयार करण्यात आली आहे. नदाबेट येथे शस्त्रास्त्रांचे प्रदर्शनही होणार असून त्यात तोफा, टँक आणि विविध उपकरणांचा समावेश आहे.
गुजरातमधील बनासकांठा जिह्यातील नदाबेट येथे भारत-पाक सीमा व्हय़ू पॉईंट 125 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. संकुलातील अनेक पर्यटन स्थळे आणि पॉईंट्स जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतील. याठिकाणी तीन आगमन आणि विश्रांतीची सुविधा असलेले पार्किंग लॉट आहेत. तसेच येथील भव्य सभागृहात एकावेळी सुमारे 500 लोक बसू शकतात. देशसेवेत बलिदान दिलेल्या सैनिकांचे स्मारक म्हणून येथे अजय प्रहरी स्मारक उभारले जात आहे. येथे 40 फूट उंचीवर तिरंगा फडकवला जाईल. या प्रकल्पामध्ये बीएसएफच्या भारताप्रती असलेल्या वचनबद्धतेचे पूर्ण प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे.
बनासकांठा जिल्हय़ातील नदाबेट येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी या व्हय़ू पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले. बीएसएफ जवान धैर्यवान असल्यामुळेच आमच्या सीमा सुरक्षित आहेत. जर देश सीमेवर सुरक्षित असेल, प्रगती करत असेल आणि त्यांच्या उंचीमध्ये वेगाने वाढ होत असेल, तर तुम्ही वेगाने प्रगती करत आहात, असाच अर्थ होतो, असे अमित शहा बीएसएफ जवानांना संबोधित करताना म्हणाले. बीएसएफचे जवान आमच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत, ते आमच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांनी काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटिरतावादावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप चांगली पावले उचलली आहेत, असे गौरवोद्गारही गृहमंत्र्यांनी यावेळी काढले.
पर्यटनस्थळाचा दर्जा
केंद्र सरकारचीही या प्रकल्पात भागिदारी आहे. भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील व्हय़ू पॉईंट हे गुजरातमधील महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरू शकते. येथे भेट देणाऱया पर्यटकांना भारतीय सीमेवरील लष्करी चौकीच्या कामकाजाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.









