खडेबाजार, सम्राट अशोक चौकाचा समावेश
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात रहदारी वाढली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागात वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. कोंडी फोडण्यासाठी नवे प्रयोग राबविण्याचा निर्णय पोलीस दलाने घेतला असून बाजारपेठेतील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी ‘वन वे’चा पर्याय अवलंबला आहे.
गुरुवार दि. 20 जुलैपासून मध्यवर्ती बसस्थानकापासून खडेबाजारमध्ये येणारी वाहतूक बॅरिकेड्स उभे करून अडविण्यात आली आहे. केवळ बाजारपेठेतून बाहेर पडण्यासाठी आता या रस्त्याचा वापर होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा बदल करण्यात आला असून साधकबाधक परिणाम लक्षात घेऊन यासंबंधी वन वे चा आदेश जारी करण्यात येणार आहे.
सम्राट अशोक चौकपासून संकम हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावरही अवजड वाहने कनकदास सर्कलमार्गे वळविण्यात आली आहेत. केवळ कार व दुचाकींना या मार्गावर प्रवेश देण्यात आला आहे. बस, ट्रक व इतर अवजड वाहनांना किल्ला तलावमार्गे कनकदास सर्कलहून गांधीनगरकडे वळविण्यात आले आहे. हे दोन्ही प्रयोग तात्पुरते असून परिणाम लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी सांगितले.
नूतन पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, पोलीस उपायुक्त शेखर एच. टी., पी. व्ही. स्नेहा व वाहतूक विभागाचे एसीपी गंगाधर आदी अधिकाऱ्यांसह शहराचा फेरफटका मारत रहदारीवर पडणाऱ्या ताणाची पाहणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी फुटपाथवर व्यवसाय थाटले आहेत. त्यांनाही बाजूला हटविण्यात येत असून प्रसंगी मनपाची मदत घेण्यात येत आहे. नवे प्रयोग राबविले नाहीत तर वाहतुकीची कोंडी सोडविता येणार नाही. म्हणून अधिकारी कामाला लागले आहेत.









