संमेलनाध्यक्ष विजय चोरमारे यांचे प्रतिपादन : कुद्रेमनीत 17 वे मराठी साहित्य संमेलन अमाप उत्साहात : साहित्यप्रेमी रसिकांची गर्दी

प्रतिनिधी /बेळगाव
स्वत:च्या मातृभाषेच्या राज्यात जाण्याची मागणी स्वाभाविक आहे. मातृभाषेतून साहित्य अधिक समृद्ध होते. दोन राज्यांना जोडण्याचे आणि गोडवा निर्माण करण्याचे काम साहित्य करते. त्यामुळे आपल्या मातृभाषेच्या समृद्धीसाठी पुढे येणे प्रत्येकाचे काम आहे. आज आधुनिक यांत्रिकीकरणामुळे जग अगदी जवळ आले आहे. अशा परिस्थितीत माणूस म्हणून जगताना लेखकांनी आपली भूमिका ठामपणे मांडली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी केले.
श्री बलभीम साहित्य संघ, कुद्रेमनी आणि ग्रामस्थ आयोजित 17 व्या मराठी साहित्य संमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, ग्रा. पं. अध्यक्षा रेणुका नाईक, सदस्या आरती लोहार, संघाचे अध्यक्ष मारुती पाटील, आर. आय. पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, जोतिबा बडसकर, अॅड. श्याम पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, चेतन पाटील, मोहन पाटील आदी उपस्थित होते.

प्रारंभी कुद्रेमनी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत आणि मराठी स्फूर्तिगीत सादर केले. मारुती पाटील यांनी प्रास्ताविकात मागील 16 वर्षांच्या संमेलनांचा आढावा घेतला. स्वागताध्यक्ष नागेश राजगोळकर यांनी स्वागत केले. सरस्वती पाटील व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक
विजय चोरमारे पुढे म्हणाले, सीमाभागातील संमेलने ही बेटे आहेत. ही बेटे अंधकार दूर करून समाज सृजनशील करत आहेत. याबरोबरच या संमेलनांच्या जत्रांतून मराठीचा गौरव होत आहे. सीमाभागातील मराठी जनतेचा आदर, सन्मान आणि त्यांच्या आंतरिक भावना राज्यकर्त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. जनतेच्या भावना दाबून ठेवता येत नाहीत. याचा प्रत्यय

लॉकडाऊनमध्ये आला आहे. त्यामुळे जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेच पाहिजे.
ज्ञानोबा, तुकाराम, चोखा मेळा यांचा आदर्श आणि भूमिका समजून घेऊन पुढे गेले पाहिजे. शिवाय त्यांची परंपरा कायम ठेवण्यासाठी वारकरी चळवळीतील धोकेही लक्षात घेणे आवश्यक आहे. साहित्य आणि राजकारण या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. साहित्यिकांना राजकारण्यांची भूमिका मांडावी लागेल. आज संविधान धोक्यात येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे संविधानासमोर आपण माथा टेकतो तर दुसरीकडे हेच संविधान धोक्यात आले आहे.
माणसानेच जाती आणि धर्मांमध्ये विभाजन केले आहे. हे विभाजन भविष्य काळात धोकादायक असल्याचे दाखवून देण्याचे काम लेखकांनी केले पाहिजे. संविधान आणि लोकशाहीसमोर आज आव्हाने उभी आहेत. शिवाय अलीकडे प्रसारमाध्यमांची परिस्थितीही गंभीर बनली आहे. आज वाचन कमी झाले असले तरी युवा पिढी सेशल मीडियावर वाचू लागली आहे. मात्र, व्हॉट्सअॅपवर चुकीचा बाजार मांडला जात आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप सोडून वाचणे आणि खरे काय, खोटे काय समजून घेणे आवश्यक आहे.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. अॅड. आरती पाटील, करुणा पाटील, डॉ. चंद्रकांत पोतदार, अर्जुन जांबोटकर आदींचा गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. विनोद कांबळे संपादित ‘सीमाप्रदेश : बोली व स्वरुप’ या पुस्तकाचा परिचय डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी करून दिला. तसेच डॉ. चंद्रकांत पोतदार लिखित ‘अक्षरलिपी’ पुस्तकाचा परिचय शिवाजी शिंदे यांनी करून दिला.
कविसंमेलन
संमेलनातील दुसऱ्या सत्रात आबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यामध्ये थळेंद्र लोखंडे, हर्षदा सुंठणकर, अमृत पाटील, विनोद कांबळे आदी कवींनी धीरगंभीर आणि विनोदी कविता सादर करून रंगत आणली.
आबासाहेब पाटील यांनी ‘मोनालिसा’ आणि ‘ज्ञानदेवा’ ही बापाची व्यथा मांडणारी कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. थळेंद्र लोखंडे यांनी ‘प्रेम म्हणजे असं कुठं असतं का?’, ‘या पाहुनी एकदा तरी’ अशा आशयाची कविता सादर करून प्रेम कसे असते हे दाखवून दिले. हर्षदा सुंठणकर यांनी ‘कपडे वाळत घालणारी बाई’ या कवितेतून स्वयंपाकघरातील आईची व्यथा मांडली. तसेच ‘फॅशन’ या कवितेतून हल्लीच्या मुलांची चाललेली फॅशन दाखवून दिली.
अमृत पाटील यांनी ‘माऊलीची माया’ या कवितेतून आईचे प्रेम तिच्या सासरी कसे असते? हे दाखवून दिले. तसेच ‘आईची माया’ या कवितेतून आईची मुलांवर असलेली माया स्पष्ट केली. या कविसंमेलनातून कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक भाष्य करणाऱ्या कविता सादर करून रसिकांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले.
भजन, टाळ-मृदंगाच्या गजरात ग्रंथदिंडी

कुद्रेमनी : ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या जयघोषात व भजनाच्या गजरात उत्साही वातावरणातील ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात झाली. गावच्या वेशीतील विठ्ठल-रखुमाई मूर्तींचे पूजन मंदिर बांधकाम कमिटी अध्यक्ष परशराम पाटील व प्रकाश गुरव दांपत्याच्या हस्ते झाले. पालखी पूजन हभप मारुती सुतार व ग्रंथ पूजन ग्रा. पं. माजी सदस्य अर्जुन जांबोटकर यांच्या हस्ते झाले. पालखी पूजन प्रकाश पाटील यांच्या हस्ते झाल्यानंतर हभप निंगाप्पा उर्फ बाबुराव पाटील यांनी हरिनामाचा मंत्र जप केला. त्यानंतर लक्ष्मी गल्ली, चव्हाट गल्ली, शिवाजी चौक, शिवाजी रोडमार्गे ग्रंथदिंडी कै. परशराम मिनाजी गुरव संमेलनस्थळी आली. ग्रंथपालखी माळा-फुलांनी आकर्षक सजविली होती.
ज्ञानेश्वरी सांप्रदायिक भजनी मंडळ, विठ्ठल रखुमाई सांप्रदायिक भजनी मंडळाची अभंगवाणी, शिवाज्ञा ढोल-ताशा पथक राकसरोप व शिवकालीन प्रात्यक्षिके, मराठमोळा वेश परिधान केलेल्या मुला-मुलींचा सहभाग, दारोदारी रांगोळीचे सडे यामुळे गावात आनंदाचे वातावरण होते.
गळ्यात वीणा घालून ग्रंथदिंडीच्या अग्रभागी हभप गावडू गुरव दिंडी सोहळ्याचे आकर्षण होते. डोईवर तुळस घेऊन सुवासिनींचा सहभाग होता. आरती ओवाळून ग्रंथदिंडीचे ठिकठिकाणी स्वागत झाले. संमेलनाध्यक्ष विजय चोरमारे, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, चंद्रकांत पोतदार, आबासाहेब पाटील, पी. पी. बेळगावकर, मालोजी अष्टेकर आदींसह साहित्यिक, ग्रा.पं. पदाधिकारी, मान्यवर, ग्रामस्थ, युवक मंडळांचा ग्रंथदिंडीत सहभाग होता.
दरम्यान, शिवाजी चौकात अश्वारुढ शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन परशराम राजगोळकर, प्रवेशद्वार उद्घाटन जोतिबा बडसकर, कै. परशराम मि. गुरव साहित्यनगरीचे उद्घाटन ईश्वर गुरव, ग्रंथ दालनाचे उद्घाटन अंकुश धामणेकर, कै. परशराम मि. गुरव स्मारक पूजन मल्लाप्पा पाटील, संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन जक्काप्पा पाटील, सरस्वती प्रतिमा पूजन मिनाजी गुरव, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन डॉ. व्ही. एम. सावंत, शिवप्रतिमा पूजन मल्लाप्पा कदम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन डॉ. विजय कट्टीमनी, राजर्षी शाहू महाराज प्रतिमा पूजन डॉ. व्ही. जी. बडसकर, संत तुकाराम प्रतिमा पूजन ग्रा. पं. उपाध्यक्ष विनायक पाटील यांच्या हस्ते झाले.
कै. गावडू पाटील सभामंडपाचे उद्घाटन कार्यकर्ते वैजनाथ पाटील यांच्या हस्ते, पॉलिहैड्रॉन व्यासपीठाचे उद्घाटन म. ए. समितीचे युवा नेते आर.एम. चौगुले यांच्या हस्ते झाले.
यावेळी संजय गुरव, आर. आय. पाटील, चंद्रकांत पोतदार, आरती पाटील, कल्पना पाटील, वैजनाथ पाटील, अर्जुन जांबोटकर, शटुप्पा काकतकर, सुनिल पाटील, शंकर पाटील, गोमाणा सुतार, सुनिल अष्टेकर यांचा सन्मान झाला.
व्यासपीठावर आर. आय. पाटील, शिवाजी सुंठकर, पी. पी. बेळगावकर, चेतन पाटील, मालोजी अष्टेकर, सुधीर चव्हाण, नितीन राजगोळकर, दीपक पावशे, मदन बामणे, ग्रा. पं. अध्यक्षा, उपाध्यक्ष, सदस्य आदींसह साहित्यिक, पाहुणे उपस्थित होते. मारुती पाटील यांनी प्रास्ताविक केले. ग्रा. पं. माजी सदस्य नागेश राजगोळकर यांनी स्वागत केले. माणिक गोवेकर व डॉ. मधुरा गुरव यांनी सूत्रसंचालन केले.
आत्माराम पाटील यांनी खळखळून हसविले

किणये : संमेलनाच्या चौथ्या आणि शेवटच्या सत्रात गडहिंग्लज येथील आत्माराम पाटील यांनी आनंदाने जगूया हा हास्यप्रयोग सादर करून रसिक श्रोत्यांना खळखळून हसविले.
प्रारंभी आत्माराम पाटील यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन संघाचे अध्यक्ष मारुती पाटील व नागेश राजगड यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. डॉ. मधुरा गुरव यांनी आत्माराम पाटील यांचा परिचय करून दिला.
व्यक्तीनुसार भाषा बदलत असते, प्रत्येकाच्या आयुष्यात बदल होत असतात. त्यामुळे प्रत्येकाने बदलांना सामोरे गेले पाहिजे. आपल्या बोलण्यात भारदस्तपणा तसेच नम्रता असायला हवी. इतरांना सुख देण्यासाठी जगता आलं पाहिजे. अलीकडे समाजात विकृती वाढली आहे. ती कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा, असे सांगितले.
खास आवाजातून नक्कल
विविध विनोद करत कामावरील निष्ठा, स्वच्छतेचे महत्त्व आत्माराम पाटील यांनी सांगितले. मोबाईल व टीव्हीवरील मालिकांचा वाढलेला मोह विनोदी शैलीतून त्यांनी श्रोत्यांना ऐकविला. कुत्र्यांचा संवाद खास आवाजातून सादर केला. दारूड्याचा विनोद, महिलांची नाव घेण्याची वेगळी पद्धत सादर केली.
अनेक कलाकारांची हुबेहूब नक्कल याचबरोबर महाराष्ट्रातील नेते शरद पवार, नारायण राणे यांच्या आवाजांची नक्कल करून दाखविली. अमिताभ बच्चन, सनी देओल, ऋतिक रोशन, अक्षय कुमार, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, नाना पाटेकर या हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची हुबेहूब नक्कल करून उपस्थितांकडून वाहवा मिळविली.
कथाकथनाने साहित्याची अभिरुची वाढली

किणये : कथाकथनाची परंपरा फार जुनी आहे. हरवत चाललेली ग्रामीण भागाची संस्कृती कथाकथनाच्या माध्यमातून मांडली पाहिजे. साहित्याची अभिरुची वाढविण्याचे काम कथाकथन करते, असे मनोगत साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात शिराळा येथील बाबा परीट यांनी व्यक्त केले.
या साहित्य संमेलनाला उपस्थित साहित्यप्रेमी रसिकांची गर्दी पाहून बाबा परीट म्हणाले की, कुद्रेमनीच्या साहित्य संमेलनाला आलोय की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला, असा भास मला होत आहे. माय मराठीचा जागर तुम्ही अगदी आत्मीयतेने करता आहात, याबद्दल सीमा भागातील तुम्हा सर्वांचा अभिमान वाटत आहे, असेही त्यांनी सांगितले.
चिंतेने ग्रासलेल्या मनाला विरंगुळा मिळण्यासाठी कथाकथन उपयोगी ठरते. विनोदी शैलीतून कथाकथनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करता येते. यासाठी नवीन साहित्यिकांनी कथाकथन करण्याकडे भर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.
शिकार ही कथा त्यांनी सादर केली. त्यांनी ग्रामीण भागात राहणाऱ्या शंकराची विनोदी शैलीत कथा मांडली. शंकरा हा खोडकर वृत्तीचा असतो. त्यामुळे तो आपली शाळा अर्धवट सोडतो. शंकराच्या गावातील विविध करामती त्यांनी या कथाकथनातून मांडल्या. शिकारीला गेला असता मृतावस्थेतील ससा शंकरा पाहतो. सशाच्या बाजूला त्याची तीन-चार पिल्ले आपल्या आईसाठी तळमळत असतात. ही मनाला भिडणारी कथा त्यांनी सादर केली.
माणसाला जशी नाती असतात, तशी चिमणी-पाखरं, जनावरांनाही नातीगोती असतात. त्यामुळे मुक्या जनावरांची शिकार करू नका, असा संदेश बाबा परीट यांनी आपल्या कथाकथनातून दिला.









