केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिलेली माहिती
मडगाव : 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्याचे ध्येय ठेवून वातावरणनिर्मिती करतानाच जनतेपर्यंत सरकारच्या योजनांची माहिती पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. चंद्रशेखर सध्या गोव्याच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी मडगावात स्थानिक आमदार दिगंबर कामत यांच्यासोबत त्यांनी जनतेशी संपर्क साधून मोदी सरकारने 9 वर्षांत राबविलेल्या विकासकामांची तसेच योजनांची माहिती जनतेला दिली. भाजपाचे दक्षिण तसेच उत्तरेतील उमेदवार अजून निश्चित होत नाहीत याकडे लक्ष वेधले असता चंद्रशेखर म्हणाले की, सध्या केंद्र सरकारच्या लोकांसाठीच्या कल्याणकारी योजना तसेच सरकारने केलेल्या विकासकामांचा आलेख जनतेसमोर ठेवण्यात येत असून अशा उपक्रमांतून वातावरणनिर्मिती केली जात आहे. निवडणूक जवळ पोहोचली की, उमेदवार निश्चित केले जातीलच, असे उत्तर त्यांनी एका प्रश्नावर दिले. चंद्रशेखर यांनी काल मडगावातील काही भागांना भेट देऊन केंद्रातील भाजप सरकारच्या कामांसंदर्भात माहिती दिली. यावेळी आमदार कामत, फातोर्डाचे माजी आमदार दामोदर नाईक तसेच नगरसेवक व पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.









