जिल्हाधिकारी नितेश पाटील : राष्ट्रीय मतदान दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक
बेळगाव : मतदार नोंदणी अभियानांतर्गत बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक युवा मतदार नोंदणी झाली आहे. प्रत्येकाने मतदानाचे मूल्य ओळखले पाहिजे. यासाठी जागृती करून मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रीय मतदान दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक युवा मतदारांची नोंदणी झाली आहे, याबद्दल मतदान नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. मतदार नोंदणीसाठी विधानसभेनुसार शिक्षण संस्थांमध्ये निवडणूक साक्षरता संघांच्या माध्यमातून व्यापक प्रचार केला पाहिजे. यासाठी मतदार जागृती व्यासपीठ, निवडणूक पाठशाळा, पदवीपूर्व आणि पदवी महाविद्यालय, कारखाने व कार्यालयांमध्ये विधानसभा मतदारसंघानुसार निवडणूक साक्षरता संघ तयार करून मतदान जागृती कार्य हाती घेण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. साक्षरता संघांची रचना करून टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबवून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दि. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा, पदवीपूर्व महाविद्यालय, पदवी महाविद्यालय या ठिकाणी जागृती कार्यक्रम राबविण्यात यावा. विविध प्रकारचे उपक्रम राबवून जागृती करावी. तसेच वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण करण्यात यावे. निवडणूक साक्षरता संघाकडून उत्तम कार्य झाल्यास त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करावा. पदवी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करून मतदार नोंदणीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे. यासाठी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार व्हनकेरी, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, स्वीप नोडल अधिकारी, योजना निर्देशक जिल्हा पंचायत यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.









