शेतकऱ्यांची मागणी : ये-जा करणे होणार सोपे, पुराचा धोकाही होणार कमी
बेळगाव : पुणे-बेंगळूर महामार्गाच्या पूर्वेकडील बाजुला असलेल्या शेतीला ये-जा करण्यासाठी शेतकऱ्यांना दोन बॉक्स बांधावेत, असा आदेश 2004 साली जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बजावला होता. मात्र अद्याप त्याबाबत कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे फेरा मारून शेताला जावे लागत आहे. तेव्हा तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन बॉक्स तयार करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बळ्ळारी नाल्याशेजारी हे बॉक्स तयार करण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. या आदेशाला आज 20 वर्षे उलटली आहेत. तरी देखील महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. जर बॉक्स तयार झाले तर शेतकऱ्यांना ये-जा करणे सोपे जाणार आहे. याचबरोबर त्या बॉक्समधून पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचराही होणार आहे. त्यामुळे या बॉक्सची नितांत गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना केवळ ये-जा करण्यासाठीच नाही तर शहराला जो सध्या पुराचा फटका बसत आहे तो देखील या बॉक्समुळे कमी होणार आहे. अतिरिक्त पाणी राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडील बाजुला जाणार आहे. त्यामुळे शहराला त्याचा मोठा फायदा होणार आहे. तेव्हा तातडीने त्या बॉक्सची निर्मिती करावी, अशी मागणी पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी केली आहे.
20 वर्षांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता
कोणताही रस्ता करायचा असेल तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्यासाठी तातडीने प्रयत्न करत असते. मात्र त्याच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करत आहे. तब्बल 20 वर्षांपूर्वी दोन बॉक्स बसविण्याचा आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिला होता. मात्र 20 वर्षे उलटली तरी त्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात आल्या आहेत. यामुळे संताप व्यक्त होत आहे.









