सावंतवाडी : प्रतिनिधी
ठाकरे पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली
शिंदे – फडणवीस सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. तसेच स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर गद्दारी करूनही जनतेला न्याय देऊ शकेल नाहीत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील गावागावात जनतेच्या दरबारात जनजागृती करा. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा परिषद शाळात शिक्षक दिले नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला.
सावंतवाडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक रूपेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली आदीनारायण मंगल कार्यालय झाली. माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार,महिला तालुका संघटक भारती कासार, तनुश्री झारापकर, युवा सेना संघटनेचे गुणाजी गावडे, उपतालुकाप्रमुख आबा सावंत, सुनील गावडे रोहीणी गावडे, अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.
राज्यातील राजकीय परिस्थिती गद्दारांनी केलेल्या कारभाराची चर्चा करून सावंतवाडी तालुक्यात गावागावात संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच शिंदे फडणवीस सरकारचे अपयश, स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची अकार्यक्षमता जनतेसमोर ठेवली पाहिजे त्यासाठी आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले पाहिजे अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली.









