चिकोडी येथे मतदानाबाबत बैठक
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदान करण्यासंदर्भात जागृती करण्यात यावी, मतदारयाद्यांची दुरुस्ती करण्यात यावी, वयस्क मतदारांची माहिती घेऊन मतदारयादी संग्रहित करावी, अशी सूचना जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी केली. चिकोडी येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. मतदारयाद्यांची योग्यप्रकारे छाननी करावी, दुरुस्ती असल्यास त्वरित करावी, संवेदनशील-अतिसंवेदनशील मतदारसंघांकडे अधिक लक्ष देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना प्रात्यक्षिके देण्याबरोबरच प्रशिक्षण देण्यात यावे, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जागृती कार्यक्रम राबवावेत, निवडणुका यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. तरच निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होणार, असे त्यांनी सांगितले. यावेळी चिकोडीचे प्रांताधिकारी मेहबुबी, तहसीलदार सी. एस. कुलकर्णी, ता. पं. कार्यकारी अधिकारी जगदीश कम्मार आदी अधिकारी उपस्थित होते.









