सभापती रमेश तवडकर यांचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांना आवाहन
काणकोण : रोजगारपूर्व प्रशिक्षण (अॅप्रेंटिसशिप) योजनेच्या अंतर्गत बेरोजगार युवक व युवतींना प्रशिक्षणादरम्यान बँकिंग, खासगी तसेच सरकारी क्षेत्रांत सामावून घेण्यासाठी सरकारच्या या योजनेखाली आधी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पंचायतींचे पंच, बूथ समित्या, भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सतर्क राहून यासंदर्भात जागृती करायला हवी, असा सल्ला सभापती रमेश तवडकर यांनी आगोंद पंचायत सभागृहात घेतलेल्या बैठकीच्या वेळी दिला. या बैठकीला सरपंच प्रीतल फर्नांडिस, माजी सरपंच फातिमा रॉड्रिग्स, पंच नीलेश पागी, विशाल देसाई, दिवाकर पागी आणि अन्य उपस्थित होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची अट नसून 7 वी ते 9 वी शिकलेल्या व्यक्तीही अर्ज करू शकतात. त्यांना 8 हजार रु., 10 वी ते 11 वी पर्यंत शिकलेल्यांना मासिक 10 हजार रु., तर 12 वी आणि त्यापुढील शिक्षण घेतलेल्यांना 12 हजार रु. वेतन मिळणार आहे. हेच वेतन कालांतराने 25 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. या योजनेखाली नोंदणी 11 जुलैपर्यंत करणे आवश्यक असून आगोंद पंचायतीमधून किमान 200 युवक-युवतींची नोंदणी त्यासाठी व्हावी, असे तवडकर पुढे म्हणाले. दरम्यान, याच योजनेसंदर्भात जागृतीसाठी सभापती तवडकर यांनी नुकतेच एका खास अशा शिबिराचे आयोजन केले. श्रीस्थळच्या पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या या शिबिराला भाजपाचे कार्यकर्ते, भाजप मंडळाचे पदाधिकारी, काणकोणच्या सातही पंचायतोंचे सरपंच, पंच, नगराध्यक्ष, नगरसेवक त्याचप्रमाणे काणकोण मतदारसंघातील 59 बुथांचे अध्यक्ष, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष उपस्थित होते. अॅप्रेंटिसशिप योजनेसंबंधी सविस्तर माहिती यावेळी सभापतींनी उपस्थित कार्यकर्त्यांना करून दिली आणि आपापल्या क्षेत्रातील बेरोजगारांना त्याचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले. काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई यांनी स्वागत केले, तर सचिव दिवाकर पागी यांनी आभार मानले.









