मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन : पेडणे येथे गोवा कृषी उत्पादन मार्केटिंग यार्ड विस्तारित इमारतीचे उद्घाटन
पेडणे : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना आणि सवलती मिळत आहेत. याचा लाभ घेत शेती व्यवसायात नवीन बदल घडवून आणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यात कृषिक्रांती घडवावी. यासाठी सरकार शंभर टक्के शेतकऱ्यांसोबत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘भिवपाची गरज ना’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पेडणे येथील गोवा कृषी उत्पादन मार्केटिंग यार्ड विस्तारित इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, कृषी उत्पादन मार्केटिंग महामंडळाचे चेअरमन प्रकाश वेळीप, उपाध्यक्ष प्रेमानंद म्हांबरे, सचिव सत्यवान देसाई, संचालक किशोर शेट मांद्रेकर, माजी अध्यक्ष व संचालक उल्हास अस्नोडकर, अमेय नाटेकर, तुळशीदास गावकर, सुवर्णा तेंडुलकर, भिकू वेळीप, विठोबा वेळीप, लक्ष्मण वेळीप, पेडणे कृषी अधिकारी प्रकाश राऊत, पेडणे तालुक्यातील विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंच, उपनगराध्यक्ष आश्विनी पालयेकर, नगरसेविका उषा नागवेकर, राखी कशालकर, तृप्ती सावळ देसाई, विशाखा गडेकर, पेडणे गटविकास अधिकारी श्री. परवार आदींचीही यावेळी उपस्थिती होती.
कृषी अनुदान लवकरच देणार!
शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले कृषी अनुदान यावर्षी लवकरच दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी शेती बागायतीसाठी केलेल्या खर्चाची बिले संबंधित विभागाकडे सुपूर्द करावी, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. ते पुढे म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी लागवड करताना आधुनिक तंत्रज्ञान वापरून वेगवेगळे प्रयोग करावे. त्याचबरोबरच आपल्या शेतजमिनीत कोणत्या प्रकारचे पीक घेतल्यास चांगले उत्पन्न मिळेल, याचा अभ्यासही गांभीर्याने करण्याची गरज आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात गोव्यात हळदीचे पीक घेऊ शकतो. त्यादृष्टीने मार्केटिंग यार्डने प्रयत्न करून शेतकऱ्यांना उत्पादन घेण्यासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन यावेळी केले.
प्रत्येक शेतकऱ्याकडे कृषी कार्ड गरजेचे!
ज्याप्रकारे आपल्याकडे हेल्थ कार्ड आहेत, त्याच प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याला कृषी कार्ड मिळणे महत्त्वाचे आहे. आता जमिनीबाबतही कार्ड आवश्यक आहे. आपल्या जमिनीमध्ये कोणते पीक घ्यावे आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचे खत वापरणे योग्य ठरणार याचा अभ्यास करावा. असे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले.
शेतीपूरक धंद्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांनी घेतल्यास लाभ!
शेती व्यवसायाबरोबरच पुरक अशा जोड धंद्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांनी घ्यावे. चारा लागवड किंवा मक्याची लागवड केल्यानंतर गाईना तो चारा उपलब्ध होऊ शकतो. उसाची फॅक्टरी बंद पडलेली आहे. परंतु मक्याची लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात हिरव्या चाऱ्याची निर्मिती होऊ शकते. आज ज्यांच्याकडे पाळीव दुभती जनावरे आहेत, त्यांना हिरव्या चाऱ्याची मोठी गरज लागते. बाहेरून लाखो नव्हे तर कोट्यावधी ऊपयांचा माल वर्षाकाठी आणावा लागतो. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी गोव्यात लागवड केली तर याचा स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. जर काजूच्या बागायतीमध्ये हळदीची लागवड केली तर मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल, यासाठी मार्केट यार्डने शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले. विद्यार्थी आता कृषी विषयक अभ्यासक्रमातही भाग घेत आहेत हे समाधानकारक चित्र आहे.
शेतकरी देशाचा कणा : श्रीपाद नाईक
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, शेतकरी हा देशाचा कणा आहे. याची जाणीव ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये वर्षाला सहा हजार जमा केलेले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवतात. त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन चांगले उत्पादन घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रकाश वेळीप यांनी मार्केड यार्डच्या कार्याचा थोडक्यात आढावा घऊन विविध कृषी उत्पादनांबाबत विविध योजनांची माहिती दिली. या इमारत प्रकल्पासाठी सुमारे तीन कोटी दहा लाख ऊपये खर्च झाल्याचे सांगितले. उपाध्यक्ष प्रेमानंद म्हांबरे यांनी आभार मानले.









