जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची सूचना
बेळगाव : रुग्णांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी अभिजन भारत असोसिएट व आयएमए यांची एक बैठक आयोजित करावी व मित्रत्त्वाच्या भावनेतून परस्परांना सहकार्य करत रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. अभिजन भारत असोसिएट व वेणुग्राम आरोग्यम तसेच आरोग्य खात्यातर्फे जिल्हा आरोग्य कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. ईश्वरप्पा गडाद उपस्थित होते. अभिजनतर्फे अॅड. माधव चव्हाण यांनी केपीएमई कायद्याबाबतच्या तरतुदींची माहिती दिली. तसेच बहुसंख्य हॉस्पिटल्समध्ये निश्चित दरात अपेक्षा, अवाजवी दर आकारले जातात, कट प्रॅक्टीसचे प्रमाण वाढले आहे, फार्मास्युटीकल कंपन्या विविध प्रलोभने देऊन ठराविक गोळ्यांचीच सक्ती करतात. गरज नसतानाही बीपी, शुगर तपासणीची चिठ्ठी पाठविली जाते, अशा तक्रारी सांगितल्या. यासर्व तक्रारींबाबत विचारविनिमय करण्यासाठी 2007 मध्ये एक समिती नेमण्यात आली. परंतु त्याची कार्यवाही सक्षमपणे झाली नाही. याकडे त्यांनी लक्ष वेधले. या सर्व मुद्यांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यापुढे समितीच्या बैठका नियमित होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच हे मुद्दे लक्षात घेऊन आयएमए सोबत एक बैठक आयोजित करून त्यामध्ये कृती आराखडा तयार करावा, अशी सूचना केली. याप्रसंगी रविंद्रनाथ चव्हाण उपस्थित होते.









