अन्न-नागरी पुरवठा खात्यातर्फे होणार कारवाई
बेळगाव : खोटी कागदपत्रे पुरवून बीपीएल कार्ड मिळविलेल्या बोगस कार्डधारकांवर कारवाई केली जाणार आहे. संबंधितांची कार्डे रद्द केली जाणार आहेत. त्यामुळे आता बोगस कार्डधारकांना मोठा दणका बसणार आहे. दारिद्र्या रेषेखालील जनतेचा आर्थिक स्तर उंचावावा, यासाठी मोफत रेशनचा पुरवठा केला जातो. मात्र या योजनेचा गैरफायदा घेतला जात आहे. काही धनाढ्या लोक खोटी कागदपत्रे पुरवून लाभ घेऊ लागले आहेत. मात्र अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे बोगस कार्डधारकांना चाप बसणार आहे. डॉक्टर, वकील, चार्टड अकौंटंट, आयकर भरणाऱ्या व्यक्ती, चार चाकी वाहने असलेले, शासकीय नोकरदार यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी अन्नभाग्य योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करून अद्यापही बोगस कार्डधारकांकडून अन्नभाग्य योजनेचा लाभ घेतला जात आहे. त्यामुळे अशा कार्डधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत बोगस कार्डधारकांची चौकशी करून सद्यस्थितीत बीपीएल कार्डधारकांची पडताळणी केली जाणार आहे.
सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, डॉक्टर, वकील, हॉटेल मालक, तीन एकर पेक्षा अधिक शेत जमीन आणि शहरात एक हजार चौरस क्षेत्रापेक्षा अधिक घर असलेल्या, वर्षाला 1 लाख 20 हजार पेक्षा अधिक उत्पन्न असलेले बीपीएलसाठी पात्र ठरू शकत नाहीत. मात्र अशांनी खोटी कागदपत्रे देऊन बीपीएल कार्डे मिळविली आहेत. अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. बोगस कार्डधारकांचा शोध घेण्यासाठी आरटीओ, महसूल खाते आणि इतर विभागाचीदेखील मदत घेतली जाणार आहे. यांच्याकडून रितसर माहिती जमा करून बोगस कार्डधारकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे बोगस कार्डधारकांसाठी अन्न व नागरी पुरवठा खाते पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. सरकारी कर्मचारी, परिवहन, हेस्कॉम, रेल्वे पोलीस आदी खात्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आपली नावे वगळून कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने बीपीएल कार्डे घेतली आहेत. याबरोबर डॉक्टर, वकील, मोठे व्यावसायिक, उद्योजक आणि निवृत्ती वेतन घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनीदेखील चुकीच्या मार्गाने बीपीएल रेशनकार्डे मिळविली आहेत. अशा बोगस कार्डधारकांचा शोध घेतला जाणार आहे.
शिधापत्रिका रद्द करून दंड वसूल करणार- श्रीशैल कंकणवाडी (अन्न व नागरी पुरवठा खाते, सहसंचालक)
खोटी कागदपत्रे पुढे करून बीपीएल कार्डे मिळविलेल्यांचा शोध घेतला जाणार आहे. बोगस कार्डे मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. यासाठी आरटीओ, महसूल खाते यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. शिवाय तातडीने शिधापत्रिका रद्द करून दंड वसूल केला जाणार आहे.









