ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर मंकी हिल्सजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. दरडीतील एक भलामोठा दगड रेल्वेच्या इंजिनखाली आल्याने रेल्वे इंजिन रुळावरुन घसरले. हे इंजिन मधल्या लेनला असल्याने आणि त्याला बोगी नसल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.
लोणावळ्याहून रेल्वे इंजिन मधल्या लेनमधून कर्जतच्या दिशेने निघाले होते. पहाटे चारच्या सुमारास मंकी हिल्सजवळ रेल्वेमार्गावर दरड कोसळली. एक मोठा दगड इंजिनखाली आल्याने इंजिन रुळावरुन घसरले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनानकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. रुळावरुन घसरलेले इंजिन मधल्या लेनला असल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नव्हता. सध्या या मार्गावरील वाहतुक सुरळीत सुरू आहे.
दरम्यान, 11 ऑगस्टला मध्यरात्रीही या मार्गावरील मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान दरड कोसळली होती. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील अप दिशेच्या ट्रकवर ही दरड कोसळली होती. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
हेही वाचा : मुंबईतील पंचतारांकित ललित हॉटेल बॉम्बने उडविण्याची धमकी








