ग्रामीण भागात खेकडे पकडण्याची लगबग : सावधगिरी बाळगा
वार्ताहर /किणये
तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पावसाळा म्हटलं की या हंगामात ग्रामीण भागात खेकडे पकडणे आणि खेकडे खवय्यांसाठी एक वेगळीच पर्वणी असते. जोरदार पाऊस सुरू असून या पावसातही तालुक्यातील काही नदी-नाल्यांच्या ठिकाणी तरुण व शेतकरी खेकडे पकडतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. काहीजण नदी-नाल्यांमध्ये रात्रीच्या वेळी जाळे टाकून येत आहेत व पहाटेच्या दरम्यान सदर जाळे बाहेर काढून खेकडे पकडू लागले आहेत. तसेच काही तरुण दिवसा नदी-नाल्याच्या ठिकाणी फिरून खेकडे पकडू लागले आहेत.
पावसाळ्याच्या कालावधीत खेकडे पकडून ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खवय्ये त्याचा स्वाद घेताना दिसत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील किणये, संतिबस्तवाड भागातील मुंगेत्री नदीच्या ठिकाणी तसेच मार्कंडेय नदीमध्ये व विविध ठिकाणी असलेल्या नाल्यांमध्ये तरुण खेकडे पकडू लागले आहेत. काहीजण या खेकड्यांची विक्री किणये, पिरनवाडी, मजगाव क्रॉस, कल्लेहोळ क्रॉस या ठिकाणी करू लागले आहेत. तसेच हिडकल धरण परिसरातून व अन्य भागातून विक्रीसाठी खेकडे कॅम्प परिसरात मोठ्याप्रमाणात येत आहेत.तालुक्याच्या विविध ठिकाणी खेकड्यांची प्रतिकिलो 200 ते 250 रुपयेप्रमाणे विक्री करण्यात येत आहे. सध्या पाऊस मोठ्याप्रमाणात सुरू आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत खेकडे पकडण्यासाठी जाणाऱ्या तरुणांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. तसेच खोल पाण्यात जाणे टाळले पाहिजे, असेही जाणकर शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.









