कोल्हापूर / इम्रान गवंडी :
गरिबांचा आधारवड असलेल्या सीपीआरने गेल्या सहा महिन्यांत 100 नवजात बालकांना जीवदान दिले. विविध गंभीर आजारांवर यशस्वी उपचार करुन मोठे यश मिळविले. मूल जन्मल्यानंतर गंभीर स्थितीत खासगी रुग्णालयात येणारा 5 ते 10 लाखांचे उपचार मोफत दिले. यामुळे थोरला दवाखाना नावाने ओळख असलेले सीपीआर हॉस्पिटल गरीब व गरजूंना वरदान ठरत आहे.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या (सीपीआर) नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) नवजात बालकांच्या श्वसनाचे आजार, जन्मजात हृदयविकार, कावीळ, फुफ्फुसाचे आजार, जन्मत: वजन कमी असणे, बाळाच्या पोटातील इन्फेक्शन, जंतुसंसर्ग, आतड्यांचे विकार, पोट विकार, फुफ्फुसांची अपरिपक्वता, बाळाची अपूर्ण वाढ, मातेच्या पोटात बाळ गुदमरने, पोटात संडास करणे, कावीळमुळे सर्व रक्त बदलणे यासारख्या जटिल व गुंतागुंतीच्या आजारांवर यशस्वी उपचार केले.
जन्मल्यानंतर गंभीर स्थिती निर्माण झाल्यास याचा खर्च लाखोंच्या घरात आहे. पण सीपीआरमध्ये हे सर्व उपचार मोफत केले जातात. सीपीआरमध्ये जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली जिह्यांतील व कर्नाटक, बेळगाव परराज्यातील रुग्णांना सेवा पुरवते. एनआयसीयू विभाग हा नवजात आणि मुदतपूर्व जन्म घेतलेल्या बालकांसाठी विशेष अतिदक्षता केंद्र आहे. ज्यात 24 तास वैद्यकीय सेवा, प्रगत उपकरणे व तज्ञ डॉक्टरामुळे बालकांना वरदान ठरत आहे. अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक, बालरोग विभाग प्रमुख डॉ. संगीता कुंभोजकर, बालरोग तज्ञ डॉ. शिशिर मिरगुंडे, विभाग इन्चार्ज डॉ. महेश्वरी जाधव व त्यांचे सहकारी सेवा देत आहेत.
- वर्षभरात 100 हून अधिक बालकांवर उपचार
विभागात 20 बेड्स असलेल्या एनआयसीयूमध्ये रोज सरासरी 5 ते 10 नवीन दाखल होतात. एनआयसीयू विभागाने गेल्या वर्षभरात 200 हून अधिक नवजात बालकांना जीवदान दिले. जिह्यात दरवर्षी सुमारे 15 टक्के बालके मुदतपूर्व जन्म घेतात. त्यामुळे गरिबांना सुविधांची मदत होत आहे.
एनआयसीयू विभागात लेव्हल 1, 2 आणि 3 च्या सुविधा आहेत. लेव्हल 1 मध्ये मूलभूत काळजी, लेव्हल 2 मध्ये मध्यम जटिलता असलेल्या बालकांसाठी विशेष काळजी व लेव्हल 3 मध्ये अत्यंत गंभीर आजार असलेल्या नवजात बालकांसाठी तृतीय पातळीची काळजी दिली जाते. या विभागात व्हेंटिलेटर, इन्क्युबेटर, हृदय मॉनिटरिंग सिस्टम आणि इतर प्रगत यंत्रणा उपलब्ध आहेत.
श्वसन व फुफ्फुसाचे आजार : अनेक बालकांना जन्मानंतर फुफ्फुसांची अपरिपक्वता किंवा जन्मजात फुफ्फुसीय आजारांमुळे श्वसनास त्रास होत होता. विभागात उपलब्ध व्हेंटिलेशन आणि डायलेसिस यंत्रणेद्वारे 25 हून अधिक बालकांना यशस्वी उपचार देण्यात आले.
बाळ पोटात गुदमरणे आणि पोटातील इन्फेक्शन : जन्मापूर्वी बाळ पोटात गुदमरणे किंवा जन्मानंतर पोटातील जंतुसंसर्ग यामुळे 15 हून बालकांना गंभीर धोका होता. अँटिबायोटिक थेरपी आणि एंडोस्कोपीद्वारे इन्फेक्शन नियंत्रित केले. आतड्यांच्या विकारावर शस्त्रक्रिया करुन बालकांना वाचवले गेले.
जन्मजात हृदयविकार : सुमारे 10 बालकांना जन्मजात हृदय दोष (कॉन्जेनिटल हार्ट डिफेक्ट) होते. एनआयसीयू विभागातील कार्डिऑलॉजी तज्ञांनी एकोकार्डिऑग्राफी आणि आवश्यक शस्त्रक्रियांद्वारे उपचार केले.
कावीळ : कावीळमुळे किडणी, ब्रेन डॅमेजचा धोका असलेल्या 20 बालकांवर फोटोथेरपी आणि गंभीर प्रकरणांत सर्व रक्त बदल (एक्सचेंज ट्रान्सफ्यूजन) करण्यात आले.
कमी वजन आणि अपूर्ण वाढ : 2.5 किलोपेक्षा कमी वजन असलेल्या 30 हून अधिक बालकांना पोषण थेरपी, इन्क्युबेटर काळजी व विशेष आहाराद्वारे वजन वाढवण्यात यश मिळाले. मुदतपूर्व जन्म घेतलेल्या बालकांची वाढ पूर्ण न झालेल्या बालाकांना नियमित मॉनिटरिंगद्वारे नॉर्मल केले आहे.
- बालकांच्या उपचारासाठी कटिबद्ध
एनआयसीयू विभाग मॉड्यूलर होणार आहे. त्यामुळे येथील उपचार अधिक गतीने व कुशलतेने केले जाणार आहेत. सीपीआरच्या एनआयसीयू विभागात जन्मजात बालकांवर यशस्वी उपचारासाठी सर्वच डॉक्टर व कर्मचारी कटिबद्ध आहेत.
– डॉ. संगीता कुंभोजकर, विभागप्रमुख
- प्रगत उपकरणे व तंत्रज्ञ विकसित
सीपीआरमध्ये सर्वच विभागातील विविध उपचारांवर गरीब व गरजूंसाठी लाखोंचे उपचार मोफत दिले जातात. आगामी काळात आणखी अत्याधुनिक उपकरणे व तंत्रज्ञ विकसित करण्याण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एनआयसीयू विभागातील कामगिरी कौतुकास्पद आहे.
– डॉ. अजित लोकरे, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय








