कोल्हापूर :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयाची (सीपीआर) इमारत हेरीटेज आहे. सीपीआर मधील एकुण 21 इमारतींच्या दुरूस्तीचे काम सुरू असून यातील दोन इमारतींचे काम पुर्ण झाले आहे. इतर 7 इमारतींमध्ये दुरूस्तीचे काम सुरू आहे. याचे मार्च 2025 पर्यंत काम पूर्ण होणार आहे. उरर्वरीत सर्वच कामे दिवाळीपर्यंत पूर्ण होतील, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
सीपीआर व शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सीपीआरचे नुतनीकरण झाल्यानंतर याचा चेहरामाहरा बदलणार आहे. यांनतर रूग्णांना दर्जेदार उपचार देण्यावर भर दिला जाईल, यासाठी नुतनीकरणाची मंजुर कामे प्राप्त निधीनुसार वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना अधिकारी व ठेकादाराला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, सीपीआरच्या इमारतींचे नुतनीकरण, स्वच्छतागृहे, ड्रेनेज लाईन, गटर्स, रस्ते आदी कामांसाठी 44 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. रूग्णांच्या उपचारात अडचणी न आणता कामे सुरू आहेत. येथील काम दर्जेदार करण्यासाठी ठेकदाराला सुचना दिल्या आहेत. शेंडा पार्क येथील 1100 बेडच्या हॉस्पीटलच्या इमारतीचे काम अद्यापही सुरू नसुन याबाबत मंत्रलयात मंगळवारी बैठक घेवून कामाला गती देणार आहे. त्याचेही काम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.
शेंडा पार्क येथील 29 एकर परिसरात भव्य आणि सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी लोकार्पण झालेल्या इमारतींचा प्रत्यक्ष वापर सोमवार दि.30 रोजीपासून होणार आहे. यामध्ये 150 क्षमतेचे मुलींचे वसतीगृह, शवविच्छेदन गृह इमारत व ओडोटोरियम तसेच परिक्षा कक्ष या इमारतींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शेंडा पार्क येथे न्यायवैद्यकशास्त्र इमारत व बॅडमिंटन कोर्टचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्यांच्या कामासाठी आवश्यक निधी नगर विकास विभागाकडून घेण्यासाठी प्रस्ताव देण्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सुचना केल्या.
सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांनी मंत्री मुश्रीफ यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. बैठकीपुर्वी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. पदभरती, पदस्थापनेचे प्रश्न तसेच पदनिर्मिती अशा विविध मागण्यांचे संघटनेच्यावतीने निवेदन दिले.
दोन वर्षात शेंडा पार्क येथील कामे पूर्ण
शेंडा पार्क येथील उर्वरीत कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदार व अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. यामध्ये 125 निवासी व 1250 क्षमता असलेल्या आंतरवासिता डॉक्टर्स पुरूष व महिला वसतीगृह, 150 क्षमतेचे मुलामुलींचे वसतीगृह, 150 परिचारिकांचे वसतीगृह व 300 परिचारीकांचे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी 175 कोटींचा निधी मंजूर करून दिला असुन दोन वर्षात सर्व कामे पूर्ण करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.








