कृष्णात पुरेकर,कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमधील प्रसुती आणि बालरोग विभागात गर्दी वाढतेय.. यामागे नैसर्गिक प्रसुतीवर भर आणि नवजात बालकांच्या सुरक्षेला दिलेले प्राधान्य.. मात्र अलीकडे मातेची डिलिव्हरी सीपीआरमध्ये आणि नवजात अर्भक मात्र खासगी हॉस्पिटलकडे पाठवले जात आहे, अशी स्थिती आहे. गेल्या काही दिवसात ‘एनआयसीयू हाऊसफुल्ल’ सांगत वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यात एजंटांची टोळी सक्रीय असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सप्ताहभरापुर्वी महापालिकेच्या पंचगंगा हॉस्पिटलमध्ये एका महिलेची डिलिव्हरी झाली, तिच्या नवजात बाळाला इनक्युबेटरची गरज होती, यासंदर्भात सीपीआरच्या एनआयसीयूमध्ये चौकशी करता जागा शिल्लक नाही. एकाच इनक्युबेटरमध्ये दोन-दोन बालकांना ठेवल्याची माहिती संब्ंाधितांनी दिली. त्यानंतर नवजात अर्भक एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. यासंदर्भात चौकशीसाठी केलेल्या फोनला विभाग प्रमुखांनी अखेरपर्यत प्रतिसाद दिला नाही. सहायक विभाग प्रमुखांनी वरिष्ठांना विचारल्याशिवाय माहिती देता येणार नाही, असे स्पष्टपणे सांगितल्याने खरंच एनआयसीयू हाऊसफुल्ल आहे का, याची चर्चा सुरू झाली.
चार दिवसांपुर्वी सीपीआर हॉस्पिटलमध्ये एका महिलेची डिलिव्हरी झाली, तिच्या बाळाला तातडीने महापालिका परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. वास्तविक त्या बालकाच्या पालकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. दोन दिवसांत खासगीमधील 20 हजारांचे बिल पाहून बाळाला पुन्हा सीपीआरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, तोपर्यत आईलाही सीपीआरमधून डिस्चार्ज मिळाला. सलग दोन दिवस बालरोग विभागप्रमुख, वैद्यकीय अधिक्षक.. अगदी एनआयसीयू हेल्पलाईनशीही संपर्क साधला. यावर रात्री फुल्ल आहे.. सकाळी फोन करा, अशी उत्तरे ऐकायला मिळाली.
सीपीआर हॉस्पिटलमधील बालरोग विभागात 10 इनक्युबेटर, दोन व्हेंटिलेटर आहेत. फोटोथेरपी, वॉर्मरही आहेत. दैनंदिन 40-42 डिलिव्हरी होतात. त्यामुळे एनआयसीयूमधील उपलब्ध यंत्रणेवर मर्यादा येत आहेत. त्यातून कित्येकदा एकाच इनक्युबेटरमध्ये दोन-दोन नवजात अर्भकांना ठेवावे लागत आहे. पण हे रोजच घडते, असे नव्हे. निदान सीपीआरमध्ये मातेची डिलिव्हरी झाली असेल तर नवजात अर्भकावर तेथील एनआयसीयूत प्राधान्याने उपचार होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने इनक्युबेटर, वॉर्मरची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.
सीपीआरमध्येच मातेची डिलिव्हरी झाली, पण बाळाला उपचारार्थ प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवले. पण याचे कारण मात्र बाळाच्या नातेवाईकांना दिले नाही. दोन दिवसांत प्रायव्हेट हॉस्पिटलममधील बिल 20 हजारांवर गेले. अॅडमिट करताना 10 हजार, दुसऱ्या दिवशी 10 हजार रूपये देताना त्या मातेच्या आर्थिक स्थितीचा विचारच झाला नाही. परिणामी, नातेवाईकांनी पुन्हा बाळाला सीपीआरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले, अगदी एनआयसीयू हेल्पलाईनशी संपर्क साधला. पण अद्यापी एनआयसीयू हाऊसफुल्ल असेच सांगितले जात आहे. बाहेरून आलेल्या नवजात अर्भकामुळे ‘सीपीआर’मधील अर्भकांना संसर्ग होऊ शकतो, या भीतीसाठी एनआयसीयू हाऊसफुल्ल असल्याचे कारण सांगितल्याची चर्चा आहे.
‘सीपीआर’मधील विविध विभागांसमोर खासगी हॉस्पिटलमधील एजंटांचा नियमित वावर असतो. ते प्रसुती, बालरोग विभागाभोवतीही घुटमळत असतात. त्यातून डिलिव्हरी सीपीआरमध्ये.. नवजात अर्भक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये… असे प्रकार घडत आहेत. अपघात विभागासमोर रात्री उशिरापर्यत काही जण रूग्ण शिफ्टिंगच्यादृष्टीने सेंटीगची चर्चा करत असल्याचेही समोर आले आहे. सीपीआरमधील रूग्ण प्रायव्हेटकडे पळवण्याच्या या प्रकाराकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता,वैद्यकीय अधिक्षक केव्हा लक्ष देणार, हा प्रश्न आहे.
Previous Articleविद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखड्यासाठी मागवल्या सुचना
Next Article खाजगीकरणाचे सावट ; हिरव्यागार टाऊन हॉलची ओळखच हरवली









