सुधाकर काशीद,कोल्हापूर
Kolhapur CPR News : कोल्हापुरातील सी.पी.आर. अर्थात छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल म्हणजे थोरला दवाखाना. या दवाखान्याची इमारत 1884 सालची म्हणजे 139 वर्षांपूर्वीची. त्यावेळी हॉस्पिटलचे नाव अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल असे होते. इमारत ब्रिटिशकालीन म्हणजे इमारतीच्या बांधकामावर ब्रिटीश बांधकाम शैलीचा सारा पगडा.. मेजर चार्ल्स माँट या विख्यात वास्तूविशारदाने या हॉस्पिटलच्या इमारतीचा आराखडा तयार केलेला.अर्थातच त्यामुळे दवाखान्याची इमारत वास्तू शिल्पाचा एक नमुना ठरली. बौद्धिक शैलीच्या बांधकामामुळे इमारतीच्या मनोऱ्यांनी सौंदर्याची उंची अधिकच वाढवली. पण या ब्रिटीश धाटणीच्या इमारतीच्या खांबात कशी कोण जाणे ‘राधाकृष्णा’ची.. नृत्यमुद्रेतील एक मूर्ती ही त्या काळात कोरली गेली.
आज आरोग्य सेवेच्या दृष्टीने या थोरल्या दवाखान्याचे स्थान जसे महत्त्वाचे आहे, तशी थोरल्या दवाखान्यातील राधाकृष्णाची जोडी ही नकळत सर्वांच्या कुतहुलाचे स्थान झाली आहे.त्या मूर्तीकडे जे श्रद्धेने पाहतात, तो त्यांच्या श्रद्धेचा जरूर भाग आहे.पण इमारतीच्या इतर सर्व खांबात वेली कोरल्या आहेत.पण या एकाच खांबावर मात्र वेलीच्या मिळत्या-जुळत्या लईत राधाकृष्णाची मूर्ती कोरली आहे.या खांबाजवळून दहा वेळा गेले तरीही मूर्ती दिसत नाही. मात्र काही क्षण थांबले की ही राधाकृष्णाची जोडी नजरेस पडते. शिल्पकलेच्या अंगाने हा खांब व त्यावर बेमालूमपणे कोरलेल्या या मूर्ती हा नक्कीच अभ्यासाचा विषय आहे.
ब्रिटीश धाटणीचे संपूर्ण बांधकाम करताना ही भारतीय संस्कृतीची एकच मूर्ती त्यात कोरून एक वेगळा मिलाफ घडवण्याचा त्या काळात कदाचित प्रयत्न झाला आहे.सी.पी.आर. म्हणजे कोल्हापूरच्या थोरल्या दवाखान्याचे बांधकाम 1881 मध्ये सुरू झाले व 1884 मध्ये संपले.बांधकामासाठी तीन लाख पाच हजार चारशे चाळीस रुपये खर्च अपेक्षित होता, प्रत्यक्षात हा खर्च तीन लाख पाच हजार दोनशे अठरा रुपये आला.म्हणजे 222 रुपये खर्च कमी झाला. खर्चाचे अचूक इस्टिमेट कसे असते, याचा प्रत्यय दवाखान्याच्या बांधकामाने आणून दिला.या इमारतीच्या प्रवेश दालनात दोन दगडी गोलाकार खांब आहेत.त्याच्या मागून वक्राकार रुंद लाकडी जिना आहे.आत प्रवेश करताच उजव्या हाताला असणाऱ्या या खांबात वेलबुटीची जी नक्षी कोरली आहे, त्यात राधाकृष्ण नृत्यमुद्रेत आहेत व दोन भिन्न बांधकाम शैलीचा या खांबात सुंदर मिलाफ घडलेला आहे.
ठरल्यापेक्षा कमी खर्च..
‘सीपीआर’चे हे बांधकाम 1881 ते 1884 या काळात झाले. पायाभरणी सर जेम्स फर्ग्युसन,कोल्हापूरचे छत्रपती चौथ्या शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत झाली.रावबहादूर महादेव वासुदेव बर्वे त्यावेळी संस्थानचे दिवाण होते.मेजर चार्ल्स माँन्ट यांनी इमारतीचा आराखडा तयार केला.आर.जे.शॅनन,मार्तंड वामन श्रोत्री हे सहाय्यक अभियंते व इमारतीचे कंत्राटदार रामचंद्र महादेव आणि कंपनी मुंबई होते.अपेक्षित खर्च 3 लाख 5 हजार 440 रूपये होता. प्रत्यक्षात हा खर्च 222 रुपये कमीच झाला.
जाता येता नमस्कार…
त्या मूर्तीची फारशी माहिती शहरवासियांना नाही. पण ‘सीपीआर’चे जुने जाणते कर्मचारी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती म्हणून या खांबाला जाता-येता नमस्कार करत होते. अलीकडेच या मूर्ती पुजल्याच्या खुणाही आहेत.
मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची असा समज..
ही मूर्ती विठ्ठल-रुक्मिणीची नसून ती राधाकृष्ण नृत्यमुद्रा असल्याचे मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा व प्रसन्न मालेकर यांनी सांगितले.








