सीपीआर हॉस्पिटलचा आदर्श : अजूनही बांधकाम भक्कम
BY: सुधाकर काशीद
कोल्हापुर: एखादी इमारत, एखादा प्रकल्प किती बजेटमध्ये करता येईल, याचा बांधकामापूर्वी अंदाज घेतला जातो. अर्थात तो खूप आवश्यकही आहे. या अंदाजपत्रकात अगदी थोडा इकडे तिकडे फरक पडू शकतो.
कोल्हापुरातली थेट पाईपलाईन योजना, राजर्षी शाहू जन्मस्थान, कोल्हापुरातील रस्ते, पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल, अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे बजेट दुप्पट झाले असले तरीही अजून त्यांचे काम सुरूच आहे. आणखी किती खर्च होणार, हे कोणीच सांगू शकत नाही, अशी परिस्थिती आहे.
पण कोल्हापुरातले एक काम असे आहे की ते धरलेल्या बजेटपेक्षा २२७ रुपयांनी कमी झाले आहे आणि कमी पैशात काम होऊनही आज १४१ वर्षे झाली, हे बांधकाम भक्कम आहे. अशी ही बजेटपेक्षा कमी खर्चाची भक्कम इमारत म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती प्रमिला राजे (सी. पी. आर ) हॉस्पिटल आहे.
सीपीआर हॉस्पिटलच्या उभारणीमुळे तर कोल्हापुरात वेगवेगळ्या आजारावरचे सुधारित उपचार सुरू झाले. अगदी १८८४ साली सीपीआर हॉस्पिटलमध्ये मानसिक रुग्णावर उपचारासाठी विशेष सोय होती. त्यासाठी स्वतंत्र छोटी इमारत होती. या इमारतीला कोल्हापूरचे लोक ‘खुळ्याची चावडी’ असे म्हणायचे.
त्यात दाखल असलेले रुग्ण जाळीच्या खिडकीजवळ येऊन चित्र-विचित्र हावभाव करत असायचे आणि ते पहायला अनेक बिनकामाचे चांगले लोक या चावडीजवळ तासन्तास थांबून आपली आपणच करमणूक करून घ्यायचे. १८८४ च्या आरोग्य अहवालानुसार या चावडीत ३७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यातले २२ जण बरे झाले.
कोल्हापूर शिवाय कागल, आजरा, गडहिंग्लज, मलकापूर या ठिकाणी चार मोठे सरकारी ववाखाने याच काळात झाले आणि आरोग्य सेवेला आधुनिक उपचाराची जोड मिळत गेली. त्याचा आराखडा तयार करणारे मेजर चार्लस मॉन्ट या अभियंत्यांचे हे एक आगळेवेगळे कर्तृत्य आहे. कोल्हापुरातील चौफाळ्याच्या माळावरचे हे हॉस्पिटल म्हणजे थोरला दवाखाना म्हणून कोल्हापुरात ओळखले जात होते. या हॉस्पिटलचे खरे नाव किंग एडवर्ड हॉस्पिटल.
पण कोल्हापूरकरांनी एवढं मोठ नाव घेण्यासाठी वेळच ठेवला नाही. त्यामुळे कोल्हापुरातला सर्वांत मोठा दवाखाना म्हणून थोरला बयाखाना असेच त्याचे व्यवहारात नामकरण केले. कोल्हापूर हिरवंगार, भरपूर पाणी असे कितीही म्हटले जात असले तरी कोल्हापूरचं आरोग्य तसं कधीच चांगले गष्ठते, पटकी, वेवी, खराज याची साथ शहर आणि परिसरात फेराफेराने येतच होती. घरगुती उपचार किंवा देशी उपचार घेतले जायचे.
खरुजाची साथ बघता बघता शाळेत पसरायची. बोटाच्या बेचक्यात पोराला खाज उठू लागली की एक औषध हक्काने ठरलेले असायचे. त्या मुलाला फिरंगाईच्या तळ्यावर म्हणजे आता तेथे न्यु हायस्कूल आहे. तेथे नेले जायचे. त्यावेळी हे हायस्कूल नव्हते आणि तेथे पेटाळा किवा फिरंगाई या नावाचे तळे होते. त्या तळ्यात त्या पोराला मानेपर्यंत बुडवले जायचे आणि भंडारा लावून घरी जायचे.
खरूज बरा होईपर्यंत पोराच्या आईने किंवा आजीने मंगळवारचा उपवास धरायचा, हे ठरलेले असायचे. याशिवाय पटकी, ताप, हगवण असे आजार तर झुंडीने आल्यासारखे कोल्हापुरात यायचे. १८४९ साली कागल परिसरात पटकी आजाराने धुमाकूळ घातला आणि ४,७७४ जणांना त्याची बाधा झाली.
त्यात २७०५ जणांचा मृत्यू झाला त्या काळात परिणामकारक आधुनिक औषधोपचार नव्हते. मात्र अशी साथ आली की कोल्हापूरच्या लोकांचा मरीआईचा गाडा सोडण्यावर भर असे. जसे खेड्यात या गावचे लोक पुढच्या गावच्या वेशीवर मरीआईच्या गाडा सोडायचे. तसे गाडे कोल्हापूर शहरात वरूणतीर्थ, ब्रह्मपुरी, कोटीतीर्थ, महार तळे, चौफाळ्याच्या माळावरसोडले जात होते. ही मरीआई आपलं आरोग्य चांगले ठेवील, अशी लोकांची श्रद्धा होती.
या सर्व पार्श्वभूमीवर १८८१ साली जेम्स फर्ग्युसन यांच्या हस्ते चौफाळ्याच्या माळावर सर्व सोयीच्या मोठ्या दवाखान्याचा पायाभरणी समारंभ झाला. १८८४ साली ही इमारत पूर्ण झाली. गॉथिक शैलीच्या या इमारतीचा आराखडा मेजर चार्ल्स माँट यांनी तयार केला.
रामचंद्र महादेव आणि कंपनी मुंबई हे या बांधकामाचे कंत्राटदार होते. शेरॉन व मार्तंड वामन शास्त्री सहाय्यक अभियंते होते. या सरकारी दवाखान्याच्या इमारतीस ३ लाख ५ हजार २१३ रुपये खर्च आला. आणि बांधकामापूर्वी चार्ल्स माँट या अभियंत्याने दिलेल्या अंदाजपत्रिकेय खर्चापेक्षा २२७ रुपये खर्च कमी आला आणि तंतोतंत अंदाजपत्रक कसे करायचे, याचा आदर्श म्हणून सीपीआर हॉस्पिटलचा कायम उल्लेख होत राहिला.
चार्ल्स मॉट या अभियंत्याने कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटल, टाऊन हॉल, नवीन राजवाडा या वास्तूंचा आराखडा तयार केला. या साऱ्या वास्तू म्हणजे कोल्हापूरचे वास्तुवैभव आहे. कोल्हापूरच्या या सरकारी दवाखान्याची मूळ रचना खूप चांगली आहे.
साधे रोग, शस्त्रक्रिया करावे लागणारे आजार, बाळंतिणीचा वार्ड. मानसिक उपचारासाठीचा स्वतंत्र कक्ष होता. भाजलेल्या रुग्णांसाठी सतत निर्जंतुक केला जाणारा स्वतंत्र कक्ष होता आणि रचना करताना एका विभागातील रोगांचा दुसऱ्या रुग्णाला संसर्ग होऊ नये, यासाठी स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात होता.
फिनेलने पुसल्या जाणाऱ्या फरशीचा घमघमाट सरकारी क्याखान्याच्या आवारात २४ तास जाणवत होता चार्ल्स गॉट यांच्या रचनेनुसार सरकारी ववाखान्याच्या आवारातच चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी राहण्याची सोय होती सिव्हिल सर्जना चिमासाहेब चौकात स्वतंत्र बगला होता, आजती तो आहे.
सीपीआरच्या मागील बाजूस निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचा बंगला होता, आजही तो आहे. पण हे दोन्ही बंगले बंद आहेत. स्टोअर म्हणून त्याचा उपयोग होत आहे, सरकारी दवाखाना झाल्यावर देवीची लस टोचण्यासाठी सिव्हील सर्जन यायचे त्यावेळी त्यांना ‘करवीर सर्जन’ म्हटले जात होते.
त्यांनी ११ जणांची निमुत्ती देवीची लस टोचण्यासाठी केली होती. प्रत्येकाच्या डाव्या हातावर पेनसारख्या एका हलक्या उपकरणाने योग ठिकाणी ही लस टोचत. मुंगी चावल्यासारखे काही वेळ वाटायचे आणि लस टोचलेली जागा काही दिवसांनी बरी व्हायची. इंग्लडहून वैद्यकशास्त्राचे शिक्षण पूर्ण करून आलेल्या डॉ. कृष्णाबाई केळवकर या स्त्री रोग उपचार कक्षाच्या प्रमुख होत्या.
या दवाखान्याच्या भव्य इमारतीत रात्री क्षणाक्षणाला सन्नाटा जाणवायचा. विव्हळणाऱ्या रुग्णांच्या आवाजाने हा सन्नाटा अधिकच गंभीर व्हायचा, अंधश्रद्धांमुळे किंवा दंतकथामुळे दवाखान्याच्या उत्तरेकडच्या भागात रात्री जायला परिचारिका आणि कर्मचारीही घाबरत असायचे.
दवाखान्यात रुग्णांना रोज मोफत जेवण, नाश्त्याला लोणी-पाव दिले जात होते. आता दवाखान्याच्या मूळ इमारतीभोवती अन्य इमारतींचा इतका वेढा पडला आहे की, सरकारी दवाखान्याची मूळ इमारत त्यात दडून गेली आहे. थोरल्या दवाखान्याचे नाव सीपीआर हॉस्पिटल म्हणून बदलले गेले आहे. सीपीआर म्हणजे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय असे त्याचे नाव आहे.








