वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माकपचे महासचिव सीताराम येच्युरी यांनी दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रथम त्यांना इमरजेन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आणि मग आयसीयूत हलविण्यात आले आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीत आहेत. येच्युरी यांना तीव्र ज्वर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
येच्युरी हे वैद्यकीय तपासणीसाठी एम्समध्ये पोहोचले होते. तेथे न्युमोनियामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले.
सीताराम येच्युरी हे माकपचे महासचिव असून दीर्घकाळापासून भारतीय राजकारणात सक्रीय आहेत. तसेच डाव्या पक्षांचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाते. येच्युरी हे अलिकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचा हिस्सा होते. या निवडणुकीत माकपची कामगिरी निराशाजनक राहिली होती. पक्षाने कमी जागा लढविल्या होत्या. केरळमध्ये सत्तेवर असलेल्या डाव्या पक्षांना तेथे लक्षणीय यश मिळविला आले नव्हते.









