कोल्हापूर प्रतिनिधी
कॉ. गोविंद पानसरे स्मारकासाठी तातडीने 50 लाखांचा निधी द्यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली. भाकपचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार पाटील यांची भेट घेऊन त्यांना ठप्प झालेल्या पानसरे स्मारकाविषयी माहिती दिली.
कॉ. पानसरे यांच्यावर 15 फेब्रुवारी 2015 साली खुनी हल्ला झाला होता. 20 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर सर्वपक्षीय बैठकीमध्ये कॉ. गोविंद पानसरे यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार महापालिकेत एकमताने ठराव झाला. त्यानंतर टप्प्याटप्पाने जागा संपादन करणे. बांधकाम सुरुवात करणे. शिल्प तसेच बांधकाम प्रारूप आराखडा याबाबत टप्प्याटप्प्याने निधी मंजूर होऊन आता हे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. हे पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार सतेज पाटील सो यांनी आमदार जयश्री जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बरोबर स्मारक ठिकाणी पाहणी करून बैठक घेतली होती. त्यावेळेस निधी बाबतही चर्चा झाली होती. त्यानंतर स्मारकाचे काम पुढे सरकलेले नाही, ठप्प झाले आहे, ही बाब भाकपच्या कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिली. जर काही काम सुरू झाले नाही तर मागील कामांना देखील तडा जाऊन त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ताबडतोब स्मारकाचे काम सुरू करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या आमदार निधीतून आपण या कामासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे हे काम माझ्या व आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्या आमदार फंडातून केले जाईल. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन शिष्टमंडळाला ग्वाही दिले. शिष्टमंडळात सम्राट मोरे, दिनकर सूर्यवंशी, वाय.एन. पाटील, बाबा ढेरे, बाळू राउ पाटील, मिलिंद मिरजकर, रियाज शेख, मधुकर माने, उत्कर्ष पवार, लक्ष्मण माने, अतुल कवाळे, अरुण देवकुळे, सिद्धार्थ कांबळे आदी कार्यकर्ते हजर होते.








