मालकाच्या प्रसंगावधानामुळे दोन म्हशी बचावल्या, मात्र गोठ्याचे मोठे नुकसान
वार्ताहर /उचगाव
लक्ष्मी गल्ली, गांधी चौक येथील रहिवासी रमेश शिवाजी देसाई यांच्या राहत्या घराला लागून असलेल्या जनावरांच्या गोठ्याला रात्री दोनच्या सुमाराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जनावरांचा संपूर्ण गोठा जळून खाक झाला. प्रसंगावधानामुळे गोठ्यामधील दोन म्हशी मात्र, बालबाल बचावल्या. आगीमध्ये गरीब शेतकऱ्याचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे रमेश देसाई यांच्या घराच्या परसामध्ये जनावरांसाठी गोठा बांधला आहे. गोठ्यामध्ये लाकूड व इतर साहित्य ठेवण्यासाठी लाकडी माळा होता. जनावरांच्या गोठ्यामध्ये रात्री रात्री दोनच्या सुमाराला शॉर्टसर्किट झाले आणि लाकडी माळ्याला आग लागली. यावेळी जनावरांचे धडपडणे आणि ओरडण्याच्या आवाजाने रमेश देसाई जागे झाले. आणि कोणताही विचार न करता स्वत:चा जीव धोक्यात घालून दोन्ही म्हशींना गोठ्या बाहेर काढल्याने त्या बचावल्या आगीत जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे. आकस्मिक झालेल्या या नुकसानीमुळे ते हतबल झाले आहेत. शासनाने त्यांना तातडीने आर्थिक साहाय्य करावे अशी मागणी रमेश देसाई आणि ग्रामस्थांनी केली आहे.









