आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची चर्चा : भारतीय संस्कृतीतील गायीचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी बाळेकुंद्री कुटुंबीयांकडून आयोजन
बेळगाव : आपण आपल्या मुलांवर जेवढे प्रेम करतो, तेवढेच प्रेम शेतकरी आपल्या मुक्या जनावरांवर करतो. वडगाव, विष्णू गल्ली येथील बाळेकुंद्री कुटुंबीयांनी आपल्या गायीच्या प्रेमापोटी तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला आहे. शहरात प्रथमत: असा आगळावेगळा कार्यक्रम झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय संस्कृतीत गायीला वेगळे महत्त्व आहे. हे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी हा कार्यक्रम थाटामाटात झाला. या कार्यक्रमासाठी पै-पाहुणे आणि शेजाऱ्यांना आमंत्रण देण्यात आले होते. हा वेगळा कार्यक्रम सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. बाळेकुंद्री कुटुंबीयांना जनावरे पाळण्याची हौस आहे. यातीलच एका पैलारू गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी तिला सजवून विधिवत पूजा व ओटी भरण्यात आली. पंचपक्वान्नाची मेजवानीदेखील ठेवण्यात आली होती. केवळ गायीच्या प्रेमाखातर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे हणमंत बाळेकुंद्री यांनी सांगितले.









