तिवोली येथील घटना : वीजवाहिन्यांसह खांब बदलण्याची मागणी
खानापूर : तालुक्यातील तिवोली येथे तुटून पडलेल्या विद्युतभारित वाहिनीच्या धक्क्याने एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 3 रोजी घडली. गेल्या सहा महिन्यांतील दुसरी घटना आहे. तिवोली येथील विद्युतखांब आणि विद्युतवाहिन्या पूर्णपणे कमकुवत झाल्या आहेत. त्या बदलण्यात याव्या, अशी मागणी करूनदेखील हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे दोन गायींचा जीव गेला आहे. हेस्कॉमच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तिवोली येथील विद्युतवाहिन्या आणि खांब बदलण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
तिवोली येथील शिवाजी हेब्बाळकर गायी चरावयासाठी शेताकडे नेताना रस्त्याच्या बाजूला तुटून पडलेल्या विद्युतभारित वाहिनीवर गायीचा पाय पडल्याने विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. याबाबत हेस्कॉम कार्यालयाला माहिती देण्यात आल्यानंतर हेस्कॉम कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. दुपारी उशिरा खानापूर पोलीस स्थानकात याची माहिती द्या, त्यानंतर आम्ही येऊ, असे सांगण्यात आले. त्यानंतर खानापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली. दुपारी उशिरा हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
तिवोली, आंबेवाडी येथे गेल्या पन्नास वर्षापूर्वी वीजवाहिन्या आणि खांब उभारण्यात आले आहेत. त्यामुळे ते कमकुवत झाले आहेत. वारंवार विद्युतवाहिनी तुटून पडण्याच्या घटना दोन वर्षांपासून घडत आहेत. विद्युतवाहिन्या आणि खांब बदलावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी हेस्कॉमकडे केली आहे. मात्र दोन वर्षांपासून याची दखल घेण्यात आलेली नाही. हेस्कॉमने येत्या महिन्याभरात वीजवाहिन्या आणि खांब बदलण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रा. पं. सदस्य रावजी पाटील यांनी दिला आहे.









