ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
सरकारच्या “निष्काळजीपणामुळे” कोरोना साथीमध्ये सर्व देशभर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला असा दावा करून सर्व मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
राहूल गांधीनी ट्विटरवर न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर करून दावा केला आहे की जागतिक कोविड मृत्यूंची संख्या सार्वजनिक करण्यासाठी भारत सरकार डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांना रोखत आहे असा आरोप केला.
“मोदीजी कधीच खरे बोलत नाहीत तसेच इतरांनाही बोलू देत नाहीत. ते अजूनही खोटं बोलत आहेत की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही!” असे राहूल गांधी यांनी अहवालाच्या स्क्रीनशॉटसह ट्विट केले आहे.
“मी यापूर्वीही सांगितले होते – कोविड दरम्यान सरकारच्या दुर्लक्षामुळे पाच लाख नव्हे तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे,” असा ही त्यांनी उल्लेख करून “मोदीजी, तुमची जबाबदारी पार पाडा. प्रत्येक कोविड पीडित कुटुंबाला चार लाख रुपयांची भरपाई द्या,” अशी मागणीही राहूल गांधी यांनी केली.