निवडणुकीची पार्श्वभूमी की आणखी काही कारण
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासह राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यामुळे अनेक अधिकारी आता कामांत गुंतले आहेत. दरम्यान तालुका पंचायतमध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांचे नामफलकही झाकण्यात आले आहेत. त्यामुळे याचे नेमके कारण समजेनासे झाले आहे. दरम्यान याबाबत अधिकाऱ्यांनीही मौन बाळगण्यात धन्यता मानली आहे. बेळगाव तालुका पंचायतमध्ये पहिल्यांदा सभागृह अस्तित्वात आले होते. त्याकाळचाही नामलफक झाकण्यात आल्याने मोठा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मागीलवेळी सदस्य असणाऱ्या नामफलकांची पाटीही झाकण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर की आणखी काही कारण असू शकते? याची चर्चा सध्या सुरू आहे. याचबरोबर तालुका पंचायतीच्या रंगरंगोटीचे कामही सुरू होते. त्या दृष्टिकोनातूनही हे फलक झाकण्यात आले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेळगाव तालुका पंचायत ही मोठी पंचायत म्हणून ओळखली जाते. मागीलवेळी 45 सदस्य या तालुका पंचायतवर निवडून आले होते. आता यामध्ये घट झाली आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. हे झाल्यानंतर राज्यातील जिल्हा व तालुका पंचायतच्याही निवडणुका लागण्याची शक्यता आहे. मात्र आतापासूनच तालुका पंचायतमधील नामफलक झाकल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.









