चला. काल दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला नमवलं. किंबहुना हे असंच घडणार होतं असे बरेच क्रिकेटचे जाणकार खाजगीत बोलत होते. पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेने प्यार तो होना ही था या उक्तीप्रमाणे यह (हार) तो होना ही था, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. एखाद्या हुशार विद्यार्थ्याने पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या युनिट टेस्टमध्ये चांगले मार्क मिळवून सुद्धा वार्षिक परीक्षेत तो गटांगळ्या खातो, अगदी तशीच परिस्थिती मागील पाच विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची झाली आहे. गंमत बघा, लीगमधील नऊ सामन्यापैकी दोन सामन्यात 400 चा टप्पा गाठणारा संघ बाद फेरीत 200 चा टप्पा कसाबसा गाठतो, यावरून दक्षिण आफ्रिकेची ऐन मोक्याच्या क्षणी कचखाऊ वृत्ती दिसून आली.
पुन्हा एकदा नशिबाने आफ्रिकेला साथ दिली नाही. किंबहुना त्यांच्या क्षेत्ररक्षकांकडून सुटलेले झेल, रिह्यू घेतल्यानंतर अंपायर्स कॉलमुळे त्यांच्या पदरी निराशाच मिळाली. का कोण जाणे, मागील काही वर्षांपासून आफ्रिकेचा संघ कोणत्या गर्तेत सापडलाय, त्यातून तो बाहेर सुटता सुटत नाहीये. कधी हवामान धोका देते तर कधी त्यांचे क्षेत्ररक्षक त्यांना तोंडघशी पाडत आहेत. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचे काही निर्णय चुकले. ऐन मोक्याच्या क्षणी कुठल्या गोलंदाजाला पाचारण करायला पाहिजे होतं त्या रणनीतीत तो पूर्णत: फोल ठरला. पॅट कमिन्स ज्यावेळी फलंदाजीला आला होता त्यावेळी स्लिप लावणं गरजेचं होतं. नेमका तिथूनच एक चौकार गेला.
पहिल्या दहा षटकात आफ्रिकेचे दोन झटपट गडी बाद झाले होते आणि फक्त 20 धावा धावफलकावर होत्या. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दहा षटकात आक्रमक फलंदाजी करत सत्तरच्या वर धावा कुटल्या, अर्थात इथेच निम्मी मॅच कांगारूंनी जिंकली होती. जिथे झॅम्पा, मॅक्सवेल यांचे चेंडू वळत होते, त्याच खेळपट्टीवर आफ्रिकेच्या कर्णधाराने पहिली 30 पैकी कमीत कमी 20 ते 22 षटके स्पिनरच्या हाती द्यायला हवी होती. नेमकं हेच गणित आफ्रिकेला स्पर्धेतून बाहेर घेऊन गेलं. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाचा हा संघ पक्का व्यावसायिक. अनुभवाची शिदोरी नेमकी काय असते याची प्रचिती आपल्याला कालच्या सामन्यात बघायला मिळाली. एक-दोन नव्हे तब्बल सात वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केलेला संघ, ज्या संघाने जिथे आक्रमकता दाखवायला पाहिजे तिथे आक्रमकता दाखवली. या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कांगारूविरुद्ध कडवी लढत दिली. खेळातल्या टेक्निकल बाबीमध्ये आफ्रिकेचा संघ थोडा कमजोर वाटला.
विश्वचषकासारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ज्यावेळी एखादा संघ उपांत्य फेरीत पाचव्यांदा पराभूत होतो, त्यावेळी त्या संघाने खोलवर जाऊन आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. एक चांगली संधी आफ्रिकेला आली होती. जर आफ्रिकेच्या संघाने झेल सोडले नसते तर, जर गोलंदाजीतील बदल अचूक असते तर, जर क्षेत्ररक्षण व्यवस्थित सजवलं असतं तर, परंतु आपण नेहमीच क्रिकेटच्या बाबतीत म्हणत आलोय, क्रिकेटमध्ये जर-तरला किंमत शून्य. असो. अजून आफ्रिकेला किमान चार वर्षे तरी विश्वचषक विजेतेपदाची स्वप्नं पहावी लागतील. याही वर्षी ते एक मोठे स्वप्न घेऊन भारतात आले होते. परंतु अखेर त्यांचा स्वप्नभंग झाला. आफ्रिकेने विश्वविजेतेपदाचे फक्त स्वप्नच पहावे, असा विचार जर क्रिकेटचे चाहते करत असतील तर त्यात गैर ते काय? पुन्हा एकदा आम्ही चोकर्सच आहोत, आणि चोकर्सच राहू असं म्हणण्यात धन्यता मानली. आता लढत आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मध्ये. दोघेही मैदानावर बलवान, दोघेही तांत्रिकदृष्ट्या सक्षम. बघूया, या लढतीत कोण उजवा ठरतो आणि कोण डावा, तो येणारा काळच ठरवेल. तूर्तास तरी अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांस शुभेच्छा!









