आयसीसी विश्वचषकाचे पडघम वाजू लागल्यानंतर खऱ्या अर्थाने वेध लागतात ते भारत-पाकिस्तान मॅचचे. अर्थात आज ती घटिका जवळ येऊन ठेपली आहे. विश्वचषकाची सुरुवात 1975 पासून झाली. 1983 मध्ये भारताने लॉर्ड्सवर दिमाखदार विजय मिळवला. त्यानंतर 1987 मध्ये कांगारुनी जेतेपद पटकावले. परंतु या चार वर्षात भारताची पाकिस्तान बरोबर लढत झाली नव्हती. त्यानंतर 1992 पासून ते 2019 पर्यंत पाकला चारीमुंड्या चीत करत आम्हीच तुमचे बाप आहोत हे ठणकावून सांगितले.
1980 ते 90 च्या दशकात ऑस्ट्रेलियन संघ स्लेजिंगमध्ये फारच अग्रेसर होता. परंतु भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान स्लेझिंगमध्ये मागे नव्हता हे त्यांनी कित्येकदा दाखवून दिले.1992 मध्ये मियांदाच्या माकडउड्या आणि त्याला त्याच पद्धतीने किरण मोरेने विकेटच्या मागे माकडउड्या मारत दिलेले रोखठोक उत्तर. 1996 मध्ये आमिर सोहेलने दाखवलेली बॅट आणि त्याच षटकात प्रसादने सोहेलला त्रिफळाचीत करत त्याला पॅव्हेलियनकडे बोट दाखवत दिलेले उत्तर. त्यानंतर सेहवागने बाप बाप होता है, बेटा बेटा होता है, हे शोएबला दिलेले उत्तर खऱ्या अर्थाने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळणारं होतं.
या विश्वचषकात भारतीय संघ तीनवेळा दिवाळी साजरी करू शकतो. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य? आज जर भारतीय संघाने पाकला नमवलं. त्यानंतर कर्मधर्म सहयोगाने उपांत्य फेरीत पुन्हा पाकिस्तानची गाठभेट झाली तर आणि सरते शेवटी अंतिम सामना भारताने जिंकला तर…. अर्थात या झाल्या जर तरच्या गोष्टी. परंतु भारताला जर अतिभव्य दिवाळी साजरी करायची असेल तर आज पाकिस्तानच्या गोलंदाजांची लक्तरे वेशीवर टांगावीच लागतील. त्याचप्रमाणे धावांचा पाया मजबूत करत टोलेजंग इमारत उभी करावीच लागेल.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणे आणि ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणे यात जमीन आसमानाचा फरक. तसाच काहीसा फरक भारत-पाक यांच्यामधील विश्वचषकातील लढत आणि इतर स्पर्धेतील लढत यात आहे. जसं 29 फेब्रुवारीला जन्मलेल्या व्यक्तीला चार वर्षातून एकदाच वाढदिवस साजरा करायला मिळतो तसं चार वर्षातून एकदा येणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत ओळीने सात वेळा भारतीय संघाने वाढदिवस साजरा केला आहे. कदाचित 1992 पासून ब्रह्मदेवाने आपल्याला तसं वरदान दिले असावे.
असो. या सामन्यात खरी लढत असणार ती विराटविरुद्ध शाहीन आफ्रिदी यांच्यामध्ये. तर दुसऱ्या बाजूला बाबर आझम आणि जसप्रीत बुमराहमध्ये. आजच्याघडीला विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. परंतु विराट कोहलीच्या फलंदाजीत टी 20 क्रिकेट, झटपट क्रिकेट, कसोटी क्रिकेट या तिन्ही फॉरमटमधील फलंदाजीचे रसायन त्याच्या बॅटमध्ये आहे हे सत्य कोणीही नाकारणार नाही. या सामन्यात क्युरेटरची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. जर अहमदाबादची खेळपट्टी पाटा निघाली तर दोन्ही बाजूने धावांचा रतीब निश्चितच बघायला मिळेल. या सामन्यात माझ्यामते तीन स्पिनर्स घेऊन खेळणे गरजेचे आहे. अफगाणिस्तानच्या सामन्यात अश्विनला वगळल्यानंतर बऱ्याच जणांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. विशेषत: गावसकर गुरुजी ही संघ व्यवस्थापनावर भलतेच नाराज होते. काल-परवा गौतम गंभीर म्हणाला होता की जर झटपट क्रिकेट जिवंत ठेवायचं असेल संमिश्र खेळपट्टी असणे गरजेचे आहे. अर्थात यात तथ्यही आहे. हिंदुस्थानात बऱ्याच क्रिकेटप्रेमींचं असं मत असतं की तुम्ही विश्वचषकाला गवसणी घाला अथवा नको घालू परंतु विश्वचषकात पाकिस्तानची नांगी ठेचा. महाभारतात शिशुपालाला 100 अपराध माफ केले होते परंतु विश्वचषकाच्या भारत-पाक सामन्यात दोन्ही संघाला एकही अपराध माफ नसणार. कारण या सामन्यात एक चूक संघाला राजाचा रंक आणि रंकाचा राव बनवू शकते. अर्थात विश्वचषकामध्ये पाकिस्तानला मागील सात सामन्यात चुकीला माफी नाही, या वाक्याचे प्रत्यांतर आले असेलच. हा सामना सुरू होण्याअगोदर भारतात बऱ्याच ठिकाणी भारत हा सामना जिंकावा म्हणून पूजाअर्चा बघायला मिळतात. काही ठिकाणी तर विजयासाठी गाऱ्हाणी घातली जातात. देव पाण्यात ठेवला जातो. बघूया नेमकं काय होतंय ते. तूर्तास या महालढतीसाठी टीम इंडियाला खूप खूप शुभेच्छा.









