क्रिकेट अथवा राजकारणात लिंबूटिंबू व्यक्तींना आपण जर दुर्लक्षित केलं तर रस्त्यावर येण्यास वेळ लागत नाही. विशेषत: क्रिकेटमध्ये लिंबूटिंबू संघाविरुद्ध अतिआत्मविश्वास बाळगल्यास मैदानात माती खाण्याशिवाय पर्याय नसतो. जसा 1983 च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात माल्कम मार्शल या वेगवान गोलंदाजाने माती खाल्ली होती अगदी तशी. परंतु कालच्या सामन्यात भारताने ज्या पद्धतीने कुठलीही दयामाया न दाखवता ज्या पद्धतीने खेळ केला तेव्हाच भारताचा विजय निश्चित झाला होता. लिंबूटिंबू संघाने प्रथितयश संघाची दाणादाण उडवल्याची घटना फारच क्वचित बघायला मिळते. याच अफगाणिस्तान संघाविरुद्ध ती वेळ आली होती. 2019 मध्ये मोहम्मद शमीच्या हॅट्ट्रिकने भारताला सावरलं होतं. असो. पहिल्याच सामन्यात कांगारूविरुद्धच्या अडखळत्या सुरुवातीनंतर किंग कोहली व राहुलने दिलेला आत्मविश्वास या सामन्यात कामी आला. पहिल्या सामन्यात ज्या जखमा झाल्या होत्या, त्यावर मलम लावत जखमा जास्त चिघळू दिल्या नाहीत.
नाणेफेक जिंकत पहले आप म्हणण्याऐवजी पहले हम, म्हणण्यात धन्यता मानत अडखळत्या सुरुवातीनंतर शाहिदीच्या अफगाणिस्तान संघाने मागच्या सामन्यातील चूक न करता पावणेतीनशेचा टप्पा गाठला खरा पण हे सुख क्षणिक राहिले. काल नियती रोहित शर्मावर प्रसन्न होती. जादूगाराने आपल्या पोतडीतून वाटेल ते बाहेर काढावे तसेच काहीसे फटके रोहितने आपल्या बॅटच्या पट्ट्यातून बाहेर काढले. मला कर्णधार शाहिदीचे काही निर्णय पचनी पडले नाहीत. त्यांचा हुकमी एक्का राशीद खानला फार उशिरा गोलंदाजीस पाचारण करण्यात आले. हे पाहून कमालीचे आश्चर्य वाटले. या सामन्यात रोहितने खऱ्या अर्थाने दबंगगिरी दाखवली. झटपट सामन्यात मी दादा फलंदाज का आहे, हे त्याने दाखवून दिले. ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ क्रिकेट समालोचक रीची बॅनो नेहमी म्हणतात, ज्यावेळी तुम्ही विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत मानसिक दडपण झुगारत फलंदाजी करत संघाला तुम्ही विराट विजय मिळवून देता, त्याचवेळी तुमच्या फलंदाजीचा कस लागतो. अर्थात यामध्ये रोहित, विराट काकणभर सरस असतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तूर्तास भारतीय संघाने बलाढ्या कांगारूला व लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानला हरवत संघातील आत्मविश्वास कमालीचा वाढवला एवढं मात्र खरं.
विजय बागायतकर (क्रिकेट समालोचक)









