काल आपण विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखदार पद्धतीने प्रवेश केला. अर्थात काल त्याचा हिरो होता विराट कोहली, श्रेयस अय्यर, आणि मोहम्मद शमी. परंतु आज आपण विराट कोहलीबद्दल बोलणार आहोत. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट 1983 पासून अगदी जवळून बघत आहे. इतक्या वर्षात सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, गुंडाप्पा विश्वनाथ, संदीप पाटील, कृष्णम्माचारी श्रीकांत, मोहम्मद अझरुद्दीन, अजिंक्य रहाणे, राहुल द्रविड, आणि सरते शेवटी सचिन तेंडुलकर अशा अनेक गुणवान फलंदाजांनी भारतीय क्रिकेटची सेवा केली. परंतु या सर्वात विराट कोहलीने एक वेगळाच ठसा उमटवलाय.
क्रिकेट जगतातील महान खेळाडूंपैकी एक म्हणून त्याची गणना का होते, हे त्याच्या बॅटने वारंवार दाखवून दिले. त्याच्या पन्नास शतकांच्या कारकिर्दीत अनेक शतकं संघ बिकट स्थितीत असताना केली हे विशेष. विराटच्या खेळातील सातत्य हा भाग फार महत्त्वाचा. जे भल्याभल्या फलंदाजांना जमलं नाही ते विराटने अगदी सहज साध्य करून दाखवलं. प्रत्येक सामन्यात त्याच्या धावांची भूक कधीच मिटली नाही. आपण त्याच्या शतकाकडे बघतो त्यावेळी आपल्याला त्याची जिद्द, त्याची चिकाटी आणि त्या शतकामागचे श्रम दिसतात. त्याने एकदा डावाची सुरुवात केल्यानंतर काही मिनिटातच तो धावांच्या मागे अधाशासारखा लागतो. प्रत्येक फॉरमॅटमध्ये ज्या पद्धतीने तो फलंदाजीचा गिअर बदलतो ते केवळ बघण्यासारखे असते.
गंमत बघा, तो ज्यावेळी फलंदाजी करत असतो त्यावेळी दुसऱ्यालाही चीअरअप करत असतो. आणि त्याच्या या पूर्ण प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत हे आपलं परमभाग्यच म्हणावे लागेल. कसोटी क्रिकेट 80 ते 90 च्या दशकात बोरिंग होऊ लागल्यानंतर खऱ्या अर्थाने झटपट क्रिकेटचे वेड हे सर्वांना लागले. अर्थात त्या काळात सचिन तेंडुलकरच्या नावानं झटपट क्रिकेटसाठी देवाने त्याला भूतलावावर पाठवलं असावं, असं मला नेहमीच वाटायचं. परंतु सचिन निवृत्त झाल्यानंतर त्याचा वारसा कोण चालवणार हा यक्षप्रश्न पडला होता. परंतु त्यानंतर नियतीने विराट नावाचा तपस्वी पाठवला. आणि बघता बघता झटपट क्रिकेटवर जी त्यांनी हुकूमत गाजवली आहे ती निश्चितच हेवा करणारी. क्रिकेटमधील शास्त्रशुद्ध फटके खेळणे हे त्याला नेहमी आवडतात. क्रिकेटमधील जो सर्वोत्तम स्ट्रोक ज्याला आपण कव्हर ड्राईव्ह या नावाने ओळखतो, त्याचं नवीन नामकरण म्हणजे विराट कव्हर ड्राईव्ह करावं असं मला नेहमी वाटतं. ज्यावेळी तो धावांचा पाठलाग करतो त्यावेळी तो आपल्या कर्णधाराला नेहमी आस्वस्थ करत आलाय की मै हु ना. गोलंदाज ज्यावेळी फलंदाजांना त्रिफळाचीत करतो त्यावेळी गोलंदाजांना जेवढा आनंद होत नाही त्याच्या दुप्पट आनंद त्याच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. कोहली हा खऱ्या अर्थाने क्रिकेटमधला राजा आहे. बघाना, त्याचे शतक पूर्ण व्हावं म्हणून केएल राहुल, जडेजा धावा काढत नाहीत.
त्याच्या आपण अॅव्हरेजकडे कटाक्ष टाकला तर टेस्टमध्ये 58, टी-20 मध्ये 52, वर्ल्डकपमध्ये 54. आयसीसी अंडर-19 चा वर्ल्डकप असो, किंवा आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना असो (मुंबईतला वानखेडे स्टेडियम मधील 2011 चा सामना) याचा आनंद त्याने याची देही याची डोळा घेतला. आणि त्या आनंददायी घटनेचा साक्षीदारही बनला. बुरे वक्त मे कैसे निकलना, ही गोष्ट विराट कोहलीला चांगली माहिती आहे. अर्जुन अवॉर्ड, पद्मश्री, खेलरत्न पुरस्कार अशा विविध पुरस्काराने तो सन्मानित झाला आहे. मी चेस मास्टरच नाही आहे तर बाद फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात सुद्धा चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून देऊ शकतो, हे त्याने काल सिद्ध केलं. असो. काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरवर तो स्वत:साठी खेळतो असा आरोप झाला होता. असाच आरोप विराट कोहलीवर काही वर्षांपूर्वी झाला होता, अजूनही होतोय. अर्थात अशा गोष्टींशी विराट कोहलीचं काही देणंघेणं नाही हे त्याने आपल्या बॅटमधून वारंवार जगाला दाखवून दिले होते. अशा या गुणवान खेळाडूने सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडीत काढल्यानंतर जी मुंबईत दिवाळी साजरी झाली ती अपेक्षितच होती. अशा या किंग कोहलीला माझा कुर्निंसात!









