पुण्यात अफगाणिस्तानविरुद्ध श्रीलंकेचा पराभव झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ बाय रोडनेच मुंबईत आला असावा. मी जे काही मैदानातून सामने बघितले त्यातलाच 2011 चा विश्वचषकातील तो अंतिम सामना. याची देही याची डोळा बघण्याचे भाग्य त्यावेळी मला मिळाले होते. ज्यावेळी धोनीने मिडविकेटवरून जो षटकार खेचला होता, आणि सुदैवाने ज्या स्टॅन्डमध्ये तो चेंडू आला होता, त्याच स्टॅन्डमध्ये मी बसलो होतो. असो. सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. जो सचिन तेंडुलकर 1987 सालच्या विश्वचषक स्पर्धेत बॉलबॉयची भूमिका निभावत होता, त्याच सचिनचा पूर्णाकृती पुतळा. हे सर्व त्याच्या घरच्या मैदानावर, केवढं हे भाग्य. आणि या सर्वांची साक्षीदार आहे ती क्रिकेटची पंढरी. असो. भारताने सहा सामने जिंकत एक मोठी थाळी फस्त केली होती. आजचा सामना हा त्यांच्यासाठी जेवणानंतरची आईक्रीम डिश होती. श्रीलंकेबद्दल सर्वसाधारण म्हटले जाते की श्रीलंकेत सोन्याच्या विटा किंबहुना सोन्याचा धूर निघणारा असा हा देश म्हणजे श्रीलंका. परंतु आज लंकेच्या क्रिकेटबद्दल म्हणायचं तर त्या क्रिकेटमध्ये सोनंही नाही आणि विटाही नाहीत. किती विदारक परिस्थिती झाली आहे लंकेची, हे या स्पर्धेत आपण बघितलंच. अर्थात त्यांच्या नशिबाने त्यांना साथ दिली नाही हे तेवढेच खरं. स्पर्धेत चार चार खेळाडू जायबंदी झाल्यानंतर लंकेचा संघ पुरता हताश झाला होता. त्यानंतर कर्णधार जखमी झाला हे म्हणजे जखमेवर अॅसिड टाकण्याचा प्रकार श्रीलंका संघासमोर झाला होता.
नाणेफेक जिंकल्यानंतर लंकेच्या कर्णधाराने झटपट निर्णय घेतला. मधुशंकाने पहिल्याच षटकात भारतीय ड्रेसिंगरूममध्ये शंकेची पाल चुकचुकवली. परंतु त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्या क्षेत्ररक्षकांनीच फोल ठरवला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पहिल्या षटकात रोहितरुपी वाघाला तुम्ही जायबंदी केल्यानंतर विराट आणि गिलच्या रूपात मोठे मासे तुमच्या गळाला लागले होते. परंतु हे मासे टोपलीत पकडता आले नाहीत, हे लंकेचे दुर्दैव. क्षेत्ररक्षकांकडून जीवदान मिळाल्यानंतर कोहली व गिलने चांगलाच प्रहार केला. गंमत बघा, या दोघांना खेळताना कोहली हा राजासारखा वावरत होता तर दुसऱ्या बाजूला गिल एखाद्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडावं तसा तो खेळपट्टीच्या प्रेमात पडला होता. त्यांच्या दोघांची फलंदाजी बघून मुंबईकर नतमस्तक झाले नसतील तरच नवल. सिनेसृष्टीतील मधुबाला आणि 90 च्या दशकातील माधुरी दीक्षित यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण हे सांगणं फार कठीण होतं. नेमकी तीच परिस्थिती काल कोहली आणि गिलच्या बाबतीत बघायला मिळाली. त्यांच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेले कोणते फटके श्रेष्ठ होते हेच कोडं पडलं होतं. श्रेयस अय्यरने मागच्या चुकांची पुनरावृत्ती केली नाही. भारताच्या साडेतीनशे धावांचा पाठलाग करताना लंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ज्या पद्धतीने श्रीलंका फलंदाजी करत होती, त्यावरून मला काही वर्षांपूर्वीचा सातच्या आत घरात हा चित्रपट आठवला. कालच्या फलंदाजीवरून श्रीलंकेच्या फलंदाजांना हॉटेलमध्ये नऊच्या आत हॉटेलवर पोहोचायचं, असाच काहीसा त्यांनी चंग बांधला होता. केवढी मोठी ही हाराकिरी. मोहम्मद शमी या पूर्ण स्पर्धेत डंका वाजवतोय. त्याची गोलंदाजी बघून बुमराहही आज फिका वाटू लागला. काय त्याचा तो जोश! सिराज आऊट ऑफ फॉर्म जातो की काय, असं वाटत असतानाच त्याचा भेदक मारा निश्चितच सुखावणारा. आज परत एकदा लंकादहन बघायला मिळालं. काल क्षणभर भारतीय संघ कसोटी सामना खेळत आहे की काय असं चित्र दिसत होतं. एका जमान्यात ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली, जेफ थॉमसन, रॉडनी हॉग या त्रिकुटाने अक्षरश: दहशत निर्माण केली होती. त्याचीच प्रचिती या विश्वचषक स्पर्धेत भारतीय त्रिकुटाने आणून दिली. वानखेडेच्या खेळपट्टीवर बऱ्याच कडू-गोड आठवणी आहेत. आज आणखी एका गोड आठवणीची त्यात भर पडली. भविष्यात ज्या ज्या वेळी श्रीलंकन संघ भारतातील येईल त्यावेळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची त्यांना निश्चितच आठवण येईल. या पूर्ण स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनी फार मोठी दहशत निर्माण केली आहे. आणि अर्थात त्या दहशतीविरुद्ध कोणीही ब्र काढण्याची हिम्मत करत नाही हे विशेष. चला शेवटी भारताने लंकापुरीचं दहन करून भारताने विजयाची सप्तपदी पूर्ण केली. त्याबद्दल पुन्हा एकदा भारतीय संघाचे त्रिवार अभिनंदन!









