काल परवा न्यूझीलंडने विश्वचषकात विजयाचा चौकार ठोकल्यानंतर काल भारतीय संघाने बांगलादेशी वाघांची शिकार केली. कालचा विजय मिळवल्यानंतर बाजीराव मस्तानी चित्रपटातील तो डायलॉग आठवला परंतु तो डायलॉग मी आता थोडा वेगळ्या पद्धतीने मांडतोय. चिते की चाल, बाज की नजर और रोहित, विराट के बल्ले पर संदेह नही करते. सलग चार विश्वचषकात चार विजय मिळवून 2007 मधील पराभवाची चक्रवाढ व्याजासहित परतफेड केली. विश्वचषक स्पर्धेत अंडरडॉग्स काय किमया करू शकतात ते तुम्ही नेदरलँड्स आणि अफगाणिस्तानला विचारा. परंतु आज बांगलादेशी वाघांनी सपशेल लोटांगण घातलं. भारतीय संघाने विश्वचषक परीक्षेतील पहिले तीन पेपर अगदी सहज सोडवले. सोडवलं नाही तर विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. कालचा पेपर भूमितीसारखा होता. प्रमेयं आकलनात आली तर शंभरपैकी शंभर मार्क. पहिले दोन प्रश्न अवघड होते (पहिली चौदा षटके ) परंतु त्यानंतर पैकीच्या पैकी मार्क आले. गंमत बघा पहिल्या पंधरा षटकात बिनबाद 90 अशी दमदार सुरुवात असताना पुढच्या 35 षटकात फक्त 160 धावा निघाल्या यावरून बांगलादेशी वाघ फक्त कागदावरच वाघ दिसले. संघाकडे अनुभव असणं म्हणजे नेमकं काय? हे काल बांगलादेशला निश्चित कळलं असेल. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मध्यमगती किंवा वेगवान माऱ्याचा विचार केला तर 1960 च्या दशकात रमाकांत देसाई, त्यानंतर कपिल देव निखंज, त्यानंतर विश्वचषकातील मॅच रेफ्री जवागल श्रीनाथ यांचे नाव फार आदराने घेतले जाते. या वेगवान गोलंदाजांची धुरा मागील काही वर्षात जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सक्षमतेने सांभाळतोय. बघाना, पन्नासाव्या षटकात महमूदुल्लास टाकलेला यॉर्कर निश्चितच दृष्ट लागण्यासारखा होता. 250 धावांचा पाठलाग करताना भारताने पाया मजबूत केला. रोहित शर्माची फलंदाजी बघून मला व्हिव रिचर्ड्सच्या त्याच्या पुस्तकातील एक वाक्य आठवलं. तो म्हणतो की, मी ज्यावेळी फलंदाजीला मैदानात जातो त्यावेळी मीच राजा असतो आणि बाकी सर्व प्रजा असते. बघाना, मागील चार सामन्यातून ज्या पद्धतीने रोहित खेळलाय त्यावरून एखाद्या राजाचा दरबारात जसा वावर असतो तसा त्याचा वावर मैदानात दिसतो. 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माच्या रूपाने भारताला एक गोड स्वप्न पडलं होतं. परंतु 2019 च्या विश्वचषकात न्यूझीलंडकडून आपला स्वप्नभंग झाला होता. असो. भारतीय प्रेक्षकांचा पाठिंबा, आणि भारतीय खेळपट्टीवर रोहितची सातत्यपूर्ण फलंदाजी निश्चितच कौतुकास पात्र. काल मला पुन्हा एकदा गावसकर गुरुजींची आठवण आली. एकदा गावसकर गुरुजींना पत्रकाराने प्रश्न विचारला होता की, चांगला फलंदाज आणि प्रतिभाशाली फलंदाज यातला फरक काय? त्यावेळी सर म्हणाले होते की चांगल्या चेंडूवर सॉलिड डिफेन्स करतो तो चांगला फलंदाज आणि त्याच चांगल्या चेंडूवर जमिनीलगत चौकार खेचतो तो प्रतिभाशाली. प्रतिभाशाली फलंदाजांत मी सर्वांचा बाप का आहे, हे पुन्हा एकदा विराट कोहलीने दाखवून दिले. बांगलादेशी खेळाडूंची अवस्था पाकिस्तानी खेळाडूंसारखी झाली होती. पाकिस्तानी त्या सामन्यात आपली देहबोली गमावली होती आणि त्याची री काल बांगलादेशने ओढली. तूर्तास तरी असं म्हणावं लागेल की विश्वचषकातील अश्वमेधाचा घोडा कोण व कसा रोखणार, हाच प्रश्न उर्वरित संघांना पडला असेल
Previous Articleआजचे भविष्य २० ऑक्टोबर २०२३
Next Article शेन बाँड मुंबई इंडियन्समधून बाहेर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









